वॉशिंग्टन डी. सी - हवामान बदलाला तोंड देण्यासाठी करण्यात आलेल्या पॅरिस करारात अमेरिका पुन्हा सहभागी झाली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री एंटनी ब्लिंकेन यांनी काल ट्वीट संदेशातून याबाबत माहिती दिली आहे. बायडेन आणि हॅरिस हे दोघेही ठामपणे हवामान आणि पर्यावरणीय न्यायाच्या बाजूचे पुरस्कर्ते आहेत.
हवामान बदलाच्या संकटाविरोधातल्या लढाईचा हा महत्त्वाचा दिवस आहे. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी अमेरीकेने यापूर्वीच प्रयत्न सुरू केले असल्याचं ब्लिंकेन यांनी म्हटलं.
जो बायडेन यांनी 20 जानेवारीला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर काही तासातच पॅरीस करारात पुन्हा सहभागी होण्याबाबत आवश्यक आदेशांवर स्वाक्षरी केली होती. गेल्या वर्षी 5 नोव्हेंबरला माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या करारातून माघार घेतली होती. करारातून बाहेर पडणारा अमेरिका एकमेव देश ठरला होता.
2017 मध्येच केली ट्रम्प यांनी केली होती घोषणा -
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2017 मध्येच आपण पॅरिस करारातून बाहेर पडणार असल्याचे जाहीर केले होते. कराराच्या नियमांनुसार, यात सहभागी असणारे देश, हा करार लागू केल्यानंतर तीन वर्षांपर्यंत यातून बाहेर पडण्याची मागणी करु शकत नाहीत. 4 नोव्हेंबर 2019 ला हा करार लागू होऊन तीन वर्षे पूर्ण झाली होती. त्यानंतर बाहेर पडण्याची प्रक्रिया होण्यासाठी एक वर्षांचा कालावधी जातो. जो, 4 नोव्हेंबर 2019 पूर्ण झाला. त्यामुळे, 5 नोव्हेंबरला अमेरिका अधिकृतरित्या पॅरिस करारातून बाहेर पडली होती.