मुंबई - बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील प्रतिभावंत कलाकारांच्या श्रेणीत पंकज कपूर यांचे नाव आघाडीवर असते. चतुरस्त्र अभिनेता असेले पंकज कपूर आज आपला 69 वा वाढदिवस साजरा करत आहेत. सर्व प्रकारच्या भूमिकांना त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. बऱ्याच वेळा त्यांच्या खासगी आयुष्यामुळेही ते चर्चेत असतात.
१९५४ साली पंजाबमधील लुधियाना येथे जन्मलेल्या पंकज कपूर यांनी लहानपणापासूनच अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. पंकजचे वडील प्राध्यापक होते आणि आईने त्यांना लहानपणापासूनच अभिनयासह छोट्या-छोट्या कामांचे प्रशिक्षण दिले होते. शाळेत पंकज अनेकदा नाटकातून भाग घेत असे. अभिनयात करियर करायचे हे त्यांनी तेव्हाच ठरवले होते. मात्र वडिलांनी शिक्षण मनापासून पूर्ण कर मगच यावर विचार करण्याचा सल्ला दिला होता. माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. विशेष म्हणजे 1973 मध्ये पंकज यांनी परीक्षेत टॉप केले. या जोरावर त्यांना नोकरीही मिळाली. पण रंगमंचावर मिळालेला प्रतिसाद त्यांना पुन्हा अभिनयाकडे जाण्यासाठी खुणावत होता. त्यामुळे त्यांनी नाटकात काम करणे पसंत केले.
सुरुवातीला त्यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टीट्यू ऑफ इंडिया ( FTII ) दरवाजा ठोठावला. पण त्यांना यश मिळाले नाही. त्यानंतर त्यांना नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश मिळाला. पंकज कपूर यांनी येथे सर्वस्व पणाला लावून ही कला आत्मसात केली व त्यानंतर त्यांनी नशीब आजमावण्यासाठी मुंबई गाठली. याच दरम्यान नृत्यकलेत प्रविण असलेल्या नीलिमा अझीमशी ओळख झाली व सुरुवातील प्रेम आणि त्यानंतर १९७५ मध्ये त्यांनी तिच्याशी लग्नही केले.
चित्रपटाचा रुपेरी पडदा त्यांना खुणावत असला तरी त्या काळात दूरदर्शन जोमात होते. सुरुवातीच्या काळात त्यांनी 'नीम का पेड', 'करमचंद', 'ऑफिस ऑफिस' सारख्या टीव्ही मालिका केल्या. त्यानंतर आपोआपच त्यांना बॉलिवूडचे दरवाजे उघडे झाले. 'जाने भी दो यारों', 'मकबूल', 'हल्ला बोल', 'आघात', 'रोजा', 'मंडी', 'गांधी' आणि 'दस' यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची चुणुक दाखवली.
त्यांच्या आयुष्यातील पहिल्या लग्नानंतर सुखाचा संसार सुरू असताना काही वर्षातच शाहिद कपूरचा जन्म झाला. पण पंकज कपूर आणि निलीमा यांच्यात खटके उडत राहिले आणि लग्नाच्या नऊ वर्षानंतर त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. यानंतर 'मौसम' या बॉलिवूड चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान पंकज कपूर यांची सुप्रिया पाठकशी ओळख झाली. सुप्रिया देखील घटस्फोटित होती. दोघांच्यात छान मैत्री व नंतर प्रेमही जमले. नंतर दोघांनीविवाह केला व त्यांना या लग्नापासून मलगी सना व मुलगा रुहान कपूर अशी दोन मुले झाली.
हेही वाचा - Zaira Wasim Support Of Niqab : झायरा वसीमने केले नकाबचे समर्थन, इंटरनेटवर गदारोळ