ठाणे - महापालिकेचे तत्कालीन आयुक्त आर. ए. राजीव यांनी सूडबुद्धीने विहंग गार्डन (Vihang Garden) या गृहसंकुलातील बांधकाम तांत्रिकदृष्ट्या बेकायदा ठरवले होते. परंतु राज्य सरकारने दंड माफ करून आम्हाला न्याय दिला आहे, असा दावा शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Shivsena MLA Pratap Sarnaik) यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. तसेच बांधकाम एक इंचही अनधिकृत असेल तर आमदार पदाचा राजीनामा देईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अनधिकृत बांधकामाचा ठपका ठेवत ठाणे महानगरपालिकेने (Thane Corporation) प्रताप सरनाईक (MLA Pratap Sarnaik) यांच्या कंपनीला तीन कोटी 33 लाख दंड ठोठावला होता. यापैकी या कंपनीने 25 लाखांची रक्कम महापालिकेकडे जमा करण्यात आली होती. हा दंड राज्य सरकारने माफ केला आहे.
- काय आहे प्रकरण?
भाजप सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नगरविकास खाते होते. त्यावेळेस नगरविकास खात्याने विहंग गार्डनमध्ये कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम झाले नाही असे स्पष्ट केले होते, असे पत्र देखील सरनाईक यांना मिळाले होते. याबाबत महापालिका स्तरावर निर्णय घ्यावा असेही त्यांनी सांगितले होते. याबाबत किरीट सोमैया आणि भाजपवाल्यांनी अभ्यास करून बोलावे, असेही सरनाईक यांनी स्पष्ट केले. किरीट सोमैया यांना दंड किती होता हे देखील माहिती नाही, अशी टीकाही त्यांनी केली. आरक्षित भूखंड आणि तो विकसित करून दिल्यास टीडीआर देण्याची योजना होती. आरक्षित भूखंडावर शाळेचे बांधकाम करून दिले. परंतु ती शाळा पालिकेने हस्तांतरित केली नाही. त्यामुळे तांत्रिकदृष्टीने विहंग गार्डनचे बांधकाम बेकायदा ठरवले गेले. जितके चटई क्षेत्र मिळणार होते, तितकेच बांधकाम केले आहे. त्यामुळे इथे एक इंचही बेकायदा बांधकाम नाही. अशाचप्रकारे इतर विकासकांनी बांधकामे केली आहेत, त्यांच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. तत्कालीन आयुक्त आर ए राजीव यांनी केवळ सूडबुद्धीने ही कारवाई केली, असे सरनाईक यांनी सांगितले. झोपडपट्टी भागात राहणाऱ्या नगरसेवकांचे पद रद्द करण्यासाठी राजीव यांनी नोटिसा काढल्या होत्या. त्या विरोधात भूमिका घेतली. तसेच राजीव यांनी केलेला भ्रष्टाचार बाहेर काढला. त्यामुळेच माझ्यावर सूडबुद्धीने त्यांनी ही कारवाई केली होती, असेही त्यांनी सांगितले.
- आघाडीतील एक मंत्री विरोधात -
महाविकास आघाडीतील एका मंत्र्याने जाणीवपुर्वक मंत्रिमंडळात हा विषय येण्याआधी एका वृत्तपत्रला दिला होता. तरी देखील अजित पवार यांनी दंड माफ केला याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. ठाण्यात अमराठी बिल्डरांना सर्व सुट दिली गेली. मात्र, प्रताप सरनाईक शिवसेनेचा आमदार आहे आणि मराठी उद्योजक आहे म्हणून जाणीवपूर्वक त्रास दिला, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्य सरकारमधला गृहमंत्री कोण आता ही चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.