ठाणे - महापालिका क्षेत्रात कोविड काळात अनधिकृत बांधकामानी डोके वर काढले असून येत्या दिवसात ठाणे भारतीय काँग्रेस अनधिकृत बांधकाम विरोधात एल्गार पुकारणार आहे. ठाणे महापलिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांला दर महिन्याला 3 करोडचा हप्ता शहरातील अनधिकृत फेरीवाले, अनधिकृत बांधकामाचा मिळत असल्याचा आरोप ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला आहे. चव्हाण यांनी केलेल्या आरोपामुळे एकच खळबळ उडाली असून ठाणे महापलिकेतला तो अधिकारी कोण? याची सीआयडी चौकशी मागणी देखील काँग्रेस नगरसेवक ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केली आहे. अनधिकृत बांधकामाच्या वाढत्या तक्रारींची दखल घेऊन काँग्रेसने सोमवारी पत्रकार परिषदेत आपली आगामी भूमिका स्पष्ट केली. यावेळी प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मनोज शिंदे, शहर काँग्रेस सरचिटणीस व प्रवक्ते सचिन शिंदे, प्रवक्ता गिरीष कोळी व सरचिटणीस विजय बनसोडे यांच्या उपस्थित होते.
ठाण्यातील अनधिकृत बांधकामाच्या वाढत्या तक्रारींची दखल घेऊन काँग्रेसने या बाधकामा विरोधात आणि बांधकामांना अभय देणाऱ्या सर्वच घटकां विरोधात ठाणे काँग्रेस एल्गार पुकारणार आहे. याची मंगळवार पासून सुरूवात होणार असल्याची माहिती शहर काँग्रेस अध्यक्ष अँड विक्रांत चव्हाण यांनी दिली. खरेतर नवीन आयुक्तांकडून आम्हाला खूप अपेक्षा होत्या. मात्र, काही अधिकारी व बांधकाम माफीयाच्या संगमताने हि बाधकामे सुरूच आहेत. अनधिकृत बांधकाम व फेरिवाल्याकडून काही अधिकाऱ्यांना 3 करोड रूपयाचा हप्त्या पोहचत असल्याचा आरोप विक्रांत चव्हाण यांनी केला असून याच्या सी.आय्.डी.चौकशीची मागणीही केली आहे.
या अनधिकृत बांधकाम करणारे व त्यांना पाठीशी घालणारे यांचे एक रॅकेट असून आता काँग्रेसचे पदाधिकारी ठीक ठीकाणी प्रभाग समिती कार्यालयासमोर आंदोलन करून विरोध करणार आहेत. यांची सुरूवात मंगळवार पासून करण्यात येणार असून दिवा प्रभाग समिती कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.
क्लस्टरसाठी काढणार लाँग मार्च -
क्लस्टर योजना लागू करण्यात आल्यापासून अद्याप त्याचे काही झालेले नाही. या योजनेमध्ये पारदर्शकता आणावी यासाठी येत्या काही दिवसांमध्ये ठाणे काँग्रेसच्या वतीने ठाणे शहरात लाँग मोर्चा काढण्यात येणार असल्याचे ठाणे शहर अध्यक्ष चव्हाण यांनी सांगितले. क्लस्टर योजनेमध्ये संभ्रम निर्माण झाला असून चुकीच्या पद्धतीने क्लस्टर योजना राबवली जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. क्लस्टर योजनेला आमचा विरोध नसून सर्वाना विश्वासात घेऊन हि योजना राबवावी असे विक्रांत चव्हाण यांनी यावेळी सांगितले.