ठाणे जिल्ह्यातील १५८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका निवडणूक आयोगाने बुधवारी जाहीर केल्या असून त्यांची अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांना बजावली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्ष निवडणूकीच्या मैदानात आजपासून सक्रिय झाले आहे. विशेष म्हणजे ठाकरे शिवसेना व शिंदे सरकारच्या सत्ता संघर्षानंतर जिल्ह्यात पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. यामध्ये ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटासह राष्ट्रवादी आणि भाजप या चार राजकीय पक्षाचे ग्रामीण भागात वर्चस्व असल्याने निवडणुका रंगतदार ठरणार आहे.
सर्वाधिक शहापूर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींचा कारभार गेल्या ९ महिन्यांपासून मुदत संपलेलय असल्याने त्या ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासकांच्या हाती देण्यात आला आहे. ग्रामपंचायतींच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या कालावधीसाठी ग्रामपंचायतींच्या कारभाराचे अधिकार प्रशासकांना देण्यात आले होते. आता तेथे महिनाभरातच लोकशाही पद्धतीची स्थानिक स्वराज्य कमिटी स्थापित झालेली पहायला मिळणार आहे. जिल्ह्यातील तीन तालुक्यात प्रामख्याने ग्रामपंचायत निवडणुका गाजणार आहे. यापैकी सर्वाधिक शहापूर तालुक्यातील ७९ ग्रामपंचायती त्या खालोखाल मुरबाड तालुक्यातील ३५ ग्रामपंचायती तर भिवंडी तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे.
चौरंगी - पंचरंगी लढतीत कोण बाजी मारणार या तिन्ही तालुक्यातील मुरबाडमध्ये भाजप आमदार किसन कथोरे यांचे वर्चस्व असून येथील सर्वाधिक ग्रामपंचायती भाजपाच्या ताब्यात आहेत. मात्र मुरबाडमध्ये राष्ट्रवादीचे तगडे आव्हान भाजप समोर असेल, तर भिवंडी ग्रामीणमध्ये शिंदे गटाचे आमदार शांताराम मोरे असून या तालुक्यात भाजप, राष्ट्रवादीसह ठाकरे व शिंदे गटाचे वर्चस्व असल्याने या ३१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये चौरंगी लढती होणार आहेत. मात्र सर्वाधिक ७९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका असलेल्या शहापूर तालुक्यात राष्ट्रवादीचे आमदार दौलत दरोडा असून या तालुक्यात राष्ट्रवादी, शिवसेना , भाजपसह शिंदे गटा शिवाय भारतीय कम्युनिस्ट पार्टीचेही काही भागात वर्चस्व असल्याने पंचरंगी लढती होणार आहेत.
असा पार पडेल निवडणुकीचा टप्पा जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील ७९, कल्याण ७, अंबरनाथ १, ठाणे ५, भिवंडी ३१, मुरबाड ३५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. जानेवारी २०२१ ते मे २०२२ या कालावधीत मुदत संपलेल्या, त्याप्रमाणेच जून २०२२ ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतींचा या निवडणूक कार्यक्रमात समावेश आहे. येत्या मंगळवार १३ सप्टेंबर रोजी निवडणूकीची अधिकृत नोटीस जारी करण्यात येणार आहे. तर बुधवार २१ सप्टेंबर ते मंगळवार २७ सप्टेंबर या कालावधीत नामनिर्देशन पत्रे दाखल करता येणार आहेत. या नामनिर्देशन पत्रांची छाननी २८ सप्टेंबर रोजी होणार आहे. ३० सप्टेंबर रोजी निवडणूक चिन्हाची मागणी करता येणार आहे. तसेच याच दिवशी उमेदवारांना आपले नामनिर्देशन पत्र देखील राखून ठेवणे अथवा मागे घेता येऊ शकणार आहे. १३ ऑक्टोबर रोजी प्रत्यक्षात मतदान घेऊन दुसऱ्या दिवशी १४ ऑक्टोबरला निकाल जाहीर केले जाणार आहेत. या संबंधीची अधिसूचना राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी जारी केली आहे.
मुख्यमंत्र्याच्या जिल्ह्यात ‘ हे’ महत्वाचे ठरणार निवडणुकीची ही अधिसूचना जारी होताच निवडणुकीच्या कार्यक्रमाची गेल्या ९ महिन्यांपासून वाट पाहत बसलेल्या गावागावात निवडणूकीच्या राजकीय हालचालींना जोरदार वेग आला आहे. यानिमित्ताने जूने हेवेदावे, राजकीय मतभेद देखील उफाळून येण्याची जोरदार चिन्हे आहेत. म्हणूनच राज्य शासनाने बिनविरोध निवडणुका घेणाऱ्या ग्रामपंचायतींना भरघोस निधीच्या बक्षीसाची योजना देखील पुढे केली आहे. मात्र राज्यातील सत्ता संघर्षानंतर ठाकरे आणि शिंदे गट आमने सामने आल्याने या जिल्ह्यातील १५८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकामधून कुठल्या बिनविरोध होतात. हे मुख्यमंत्र्याच्या जिल्ह्यात महत्वाचे ठरणार आहे.