सोलापूर - आंतरराष्ट्रीय ग्लोबल अवॉर्ड विजेते रणजितसिंह डिसले हे आज ( मंगळवारी ) 19 जून रोजी सोलापूर जिल्हा परिषदेत आले होते. मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, उपशिक्षणाधिकारी जावीर यांसोबत बंद खोलीत रणजितसिंह डिसले ( Ranjitsinh Disale ) यांनी तासभर चर्चा केली. मिटिंग झाल्यानंतर रणजीत डिसले यांना घेरून त्यांना विविध प्रश्नांचा भडीमार केला मात्र त्यांनी जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या दशसूत्री कार्यक्रमासाठी चर्चा करण्यासाठी आलो होतो, असे सांगून वेळ मारून नेला.
डिसले गुरुजींवर निश्चित कारवाई होणार असल्याची चर्चा : 7 जुलै रोजी ग्लोबल टीचर विजेते रणजित डिसले यांनी जिल्हा परिषद उपशिक्षक पदाचा राजीनामा दिला आहे. 8 ऑगस्टपर्यंत त्यांचा राजीनामा मंजूर होणार आहे. दरम्यान त्यांच्या अनियमिततेबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी चौकशी समिती नेमली होती. त्या पाच सदस्यीय चौकशी समितीचा अहवाल आला आहे. त्या सर्वच बाबतीत डीसले गुरुजी हे दोषी आढळले आहेत, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता डिसले यांच्यावर निश्चित कारवाई होणार, अशी चर्चा सुरू झाली.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसमोर कैफियत मांडली : रणजितसिंह डिसले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली आहे. कारवाईतून सुटका करून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. एकूण या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास रणजित डिसले यांनी जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन बराच वेळ चर्चा केली.
रणजितसिंह डिसले यांनी उत्तरे देण्यास टाळाटाळ केली : रणजितसिंह डीसले हे चर्चेनंतर ते जेव्हा बाहेर आले तेव्हा सर्व पत्रकारांनी त्यांना घेरले. नेमकी काय चर्चा झाली, याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. प्रश्नांचा भडीमार केला, मात्र डिसले यांनी एकाही प्रश्नावर सविस्तर उत्तर दिले नाही. केवळ मी मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांच्या दशसूत्री कार्यक्रमाची चर्चा करण्यासाठी आलो होतो, असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला आणि जिल्हा परिषदेतून पळ काढला. दरम्यान सीईओ स्वामी यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला मात्र ते बैठकीत असल्याने त्यांची प्रतिक्रिया घेता आली नाही.
हेही वाचा - Ranjitsingh Disale : डिसले गुरुजी बडतर्फ किंवा सेवामुक्त होऊ शकतात - शिक्षणाधिकारी