सोलापूर: सोलापूर-तुळजापूर महामार्गावर बापलेकीचा ट्रक खाली चिरडून मृत्यू झाला आहे. हा अपघात सोमवारी सायंकाळी 6 च्या सुमारास झाला. यामध्ये नागनाथ लिंगप्पा गगनहळी (वय 65 रा,वसुंधरा अपार्टमेंट, दमानी शाळेजवळ, सोलापूर), व सपना शीतल विभूते (वय 36) या दोघा बापलेकीचा मृत्यू झाला आहे. पर्ल गार्डन समोरील तुळजापूरला जाणाऱ्या वळणावर हा अपघात झाला.

सपना शीतल विभूते व नागनाथ गगनहळी हे दुचाकीवरून सायंकाळी घराकडे जात होते. महामार्गावर असलेल्या पर्ल गार्डनच्या बाजूला तुळजापूरला जाण्यासाठी बायपास वळण आहे. ह्या वळणावर सोलापूरहून उस्मानाबादकडे गॅस टाक्या घेऊन निघालेला ट्रक (एम एच 25 बी 9977) हा आला. वळण घेत असताना ट्रक चालकाला दुचाकीचा अंदाज न आल्याने अपघात झाला.

काही क्षणातच ट्रक खाली चिरडून वडील आणि मुलगी जागीच ठार झाले. अपघात झाल्यानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. नागरिकांनी ट्रक चालक पांडुरंग नामदेव शिंदे याला पकडून पोलिसांच्या हवाली केले. गर्दीमुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी गर्दी हटवून वाहतूक सुरळीत केली. मृतदेह शव विच्छेदनासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठविले आहेत.
सपना विभूते यांना पाच वर्षांचा मुलगा आहे. त्यांचे सासर सांगली येथे आहे. कौटुंबिक वादातून गेल्या अनेक महिन्यांपासून ते सोलापूर येथे आपल्या मुलाला घेऊन माहेरीच आई वडिलांकडे राहत होत्या. सपना विभूते यांच्या अपघाती मृत्यूने मुलावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.