पुणे - मित्रांसोबत पोहायला गेलेल्या तरुणाचा भामा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना खेड तालुक्यातील वाकी येथे गुरुवारी सायंकाळी घडली. मनोज गद्री, असे नदीत बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
हिंजवडी येथील मनोज हा मित्रांसोबत पोहण्यासाठी भामा नदीत आले होते. यावेळी मनोज पोहताना बुडाल्याने खळबळ उडाली. त्याच्या मित्रांनी त्याचा शोध घेतला, मात्र तो मिळून आला नाही. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनीही मनोजचा शोध घेतला, मात्र यश आले नाही.
आज सकाळी एनडीआरएफच्या जवानांनी वाकी येथील भामा नदीत शोधमोहीम सुरू केली. यावेळी मनोजचा मृतदेह बाहेर काढण्यात जवानांना यश आले.
भामा नदीपात्रात पाण्याची पातळी कमी असून पात्रांमध्ये खडकाळ भाग मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या नदीपात्रात बुडण्याच्या घटना वाढत आहेत. मात्र, नदीपात्राच्या सुरक्षेबाबत प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना करण्यात येत नसल्याचा आरोप गावकरी करत आहेत.