पुणे - संचारबंदीच्या काळात ठिकठिकाणच्या स्थानिक प्रशासनाकडून शहर, गाव आणि खेड्यातील रस्त्यावर सोडियम हायपोक्लाराईट या जंतू नाशकाचा वापर करून फवारणी केली जाते. मात्र कोरोना संसर्ग आणि सोडियम हायपोक्लाराईट फवारणीचा संबंध नसल्याची माहिती डॉ. अनंत फडके यांनी दिली आहे. उलट या फवारणीचा अतिवापर केल्यास त्यातील औषधांचा नागरिकांना धोका होऊ शकतो असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कोरोना विषाणूचा संसर्ग राज्यात वाढत असताना आरोग्य विभाग, पोलीस यंत्रणा तसेच ठिकठिकाणचे जिल्हा प्रशासन हे केंद्र आणि जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या गाईडलाईन्सनुसार अहोरात्र काम करत हा संसर्ग रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हा संसर्ग आपल्यापर्यंत येऊ नये, यासाठी नागरिक प्रशासनाकडे आस लावून बसले आहेत. यातच आता या फवारणीचे स्तोम माजवण्यात येत आहे.
ठिकठिकाणचे लोकप्रतिनिधीमध्ये आपापल्या वार्डात फवारणी करून घेण्याची चढाओढ सुरू आहे. नागरिकांनाही आपल्या भागात फवारणी व्हावी, असे वाटत आहे. मात्र या फवारणीचा आणि कोरोना संसर्ग रोखण्याचा काहीही संबंध नसल्याचे जाणकार सांगत आहेत. उलट या फवारणीचा अतिवापर केल्यास त्यातील औषधांचा धोका नागरिकांना होऊ शकतो, असे आरोग्य क्षेत्रातील जाणकार सांगतात. मुळात जागतिक आरोग्य संघटना, केंद्रीय आरोग्य मंत्रालय किंवा कुठल्याही जबाबदार आरोग्य संस्थेने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अशा प्रकारची घराभोवती फवारणी करण्यास सांगितलेले नाही. त्यामुळे अशा प्रकारची फवारणी ही विशिष्ट परिस्थितीत करायची असते. ती सुद्धा आरोग्य विभागाने सांगितल्यानुसार. त्यामुळे या फवारणीचा आणि कोरोना संसर्ग रोखण्याचा संबंध नसल्याचे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले आहे.