पुणे - गेल्या दीड ते दोन वर्षांपासून रिक्त असलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती होणार याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांची नियुक्ती होईल, अशी चर्चा आहे. दरम्यान यावरुन सध्या चांगलेच राजकारण रंगताना दिसत आहे. भाजपाच्या महिला आघाडीच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी ट्वीट केले असून यात त्यांनी रावणाला मदत करणारी 'शुर्पणखा' बसवू नका, असे म्हटले आहे. वाघ यांनी यात कोणाचेही नाव घेतलेले नाही. मात्र, त्यांचा रोख राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडे असल्याची चर्चा आहे. त्यामुळे यावरून नवा वाद सुरू झाला आहे. तर चित्रा वाघ यांच्या या ट्विटवर रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया देत चित्रा वाघ यांच्या ट्विट आपल्याला काही बोलायचे नाही. ज्या गोष्टीची माहितीच नाही त्याबद्दल वक्तव्य करणे चुकीचे असल्याचे रुपाली चाकणकर यांनी सांगितले आहे.
चाकणकरांची प्रतिक्रिया
चित्रा वाघ यांच्या टि्वटबद्दल मला काही बोलायचे नाही. तसेच महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती होणार असल्याची कुठलीच कल्पना नाही, असेही चाकणकर यांनी स्पष्ट केले. ज्या गोष्टीची माहितीच नाही त्याबद्दल वक्तव्य करणे चुकीचे आहे, असे चाकणकर म्हणाल्या. संघटनेची महिला अध्यक्ष म्हणून उत्तम रित्या काम चालू आहे. मनाला समधान आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
'क्षुल्लक गोष्टींवर बोलणार नाही'
दरम्यान, चित्रा वाघ यांच्या ट्विटवर रुपाली चाकणकर यांनी देखील थेट टीका न करता अप्रत्यक्ष शब्दांतच निशाणा साधला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खूप मोठे प्रश्न आहेत. आत्ता कुठे राज्यातली जनता सावरत आहे. अनेक मोठे प्रश्न असताना इतर क्षुल्लक गोष्टींवर लक्ष द्यायला वेळ नाही. एक जबाबदार नागरिक म्हणून आपली भूमिका निभावणे महत्त्वाचे आहे, असे रुपाली चाकणकर यांनी सांगितले आहे.
असे आहे चित्रा वाघ यांचे ट्विट
महिलांचे शील भ्रष्ट करणारे रावण राजरोस फिरताहेत, पण राज्य महिला आयोगाला अद्याप अध्यक्ष नाही हे लाजिरवाणं आहे. अध्यक्ष लवकर नेमावा पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी 'शुर्पणखा' बसवू नका. अन्यथा प्रत्येकवेळी सरकारचंच नाक कापलं जाईल, असे टि्वट चित्रा वाघ यांनी केलं आहे.
हेही वाचा - शूर्पणखा म्हणून मी कोणाचेही नाव घेतलेले नाही - चित्रा वाघ