पुणे - पिंपरी-चिंचवडमध्ये ३ मुलांचा खून करुन आईने स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून रविवारी दुपारी ४ च्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे.
आईने राहत्या घरात तीन मुलांना गळफास देऊन स्वतः आत्महत्या केली यात २ मुलींचा आणि १ मुलाचा समावेश आहे. फातिमा अक्रम बागवान (२८) असे पोटच्या मुलांचा खून करणाऱ्या आईचे नाव आहे. तर अलफिया अक्रम बागवान (९), झोया अक्रम बागवान (७) आणि जिआन अक्रम बागवान (६) अशी मृत मुलांची नावे आहेत. हे सर्व मूळ कर्नाटक येथील असून गेल्या चार दिवसांपूर्वी ते भोसरी येथे कुटुंबासह राहण्यास आले होते.
फातिमा यांचे पती अक्रम बागवान हे फळ विकण्याचा व्यवसाय करतात. मात्र, त्यांना सतत या व्यवसायात अपयश येत होते. त्यांनी तळेगाव येथे देखील हा व्यवसाय केला. मात्र, तिथे त्यांना अपयश आले आणि त्यांचे मोठे नुकसान झाले. यामुळे त्यांचे पत्नीसोबत वाद झाल्याची प्राथमिक माहिती भोसरी पोलिसांनी दिली आहे. आज सकाळी पती अक्रम हे घराबाहेर गेले होते. त्यानंतर आज रविवार असल्याने तिन्ही मुले घरीच होती. सकाळी ११ ते ४ च्या दरम्यान फातिमा यांनी आपल्या पोटच्या मुलांचा खून करुन स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. अक्रम हे दुपाची ४ च्या सुमारास घरी आले. त्यांनी दरवाजा ठोठावला. मात्र, आतून प्रतिसाद आला नाही. असे बऱ्याच वेळ झाल्यानंतर त्यांनी शेजारच्या व्यक्तीला सांगितले आणि भोसरी पोलिसांना बोलवून घेण्यात आले. तातडीने येऊन पोलिसांनी घराचा दरवाजा तोडताच चार जणांचे लटकलेल्या अवस्थेत मृतदेह दिसले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहेत. घटनेचा अधिक तपास भोसरी पोलीस करत आहेत.