पणजी - कोरोना विषाणू संसर्गाविषयी जेवढे बोलले अथवा सांगितले जात आहे, तेवढी वाईट स्थिती नाही. तरीही विमानतळावर उतरणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची तपासणी व्हायला हवी. मग तो देशांतर्गत असो अथवा विदेशातून आलेला असो. परंतु, गोव्याच्या विमानतळावर, अशी कोणतीही तपासणी का होत नाही?, असा प्रश्न प्रसिद्ध पार्श्वगायिका हेमा सरदेसाई यांनी उपस्थित केला आहे.
आज सकाळी आपल्या ट्विटमध्ये सरदेसाई यांनी गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांना प्रश्न विचारला आहे, की गोव्याच्या दाबोळी विमानतळावर अद्यापही प्रवाशांची तपासणी का केली जात नाही? याची विचारणा विमानतळ प्राधिकरणाकडे करण्याची मागणी केली आहे. त्याबरोबरच विषाणू बाधेपासून लोकांचे जीव वाचवण्यासाठी रात्रंदिवस काम करणाऱ्या जगभरातील डॉक्टरांचे कौतुक करत त्यांना सलाम केला आहे.
हेही वाचा - मुलाचे पदवीप्रमाणपत्र खोटे असल्याचे सिद्ध! गोवा उपसभापतींनी तत्काळ पायउतार होण्याची विरोधकांची मागणी
दरम्यान, कोरोना विषाणूचा भारतातला दुसरा बळी गेला आहे. दिल्ली येथे कोरोनाची लागण झालेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे. ही महिला 65 वर्षांची होती. दिल्ली येथील रुग्णालयात या महिलेवर उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरू असतानाच या महिलेचा मृत्यू झाला. ही महिला पश्चिम दिल्लीत राहणारी होती. तिचा मुलगा स्वित्झर्लंड येथून परतला होता. ही महिला त्याच्या संपर्कात आल्याने तिला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर तिच्यावर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू होते.