पणजी (गोवा) : राज्यात जास्तीत जास्त नागरिकांनी घराबाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावत लोकशाहीच्या या उत्सवात सर्वांनी मिळून सहभागी व्हावे असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांनी केले. यावेळेस त्यांनी राज्यात निवडणुकीची पूर्ण तयारी झाल्याचीही माहिती दिली आहे. अफवांवर विश्वास न ठेवता निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी केले आहे. राज्यात निवडणूक प्रक्रिया निर्भय आणि शांततापूर्ण पद्धतीने पार पाडण्यासाठी आमची प्रशासकीय यंत्रणा तैनात झाली असून याविषयी योग्य ती तयारी पूर्ण झाल्याचे निवडणूक अधिकारी यांनी सांगितले.
गोवा निवडणुकीसाठी मोठी चुरस
गोवा विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी ( दि. १४ ) मतदान प्रक्रिया पार पडणार ( Goa Assembly Election 2022 Voting ) आहे. यंदा गोव्याच्या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. अनेक राजकीय पक्षांनी तरुण उमेदवारांना संधी दिली आहे. तर काही पक्षांनी अनुभवींना प्राधान्य दिले आहे. अनेक नवमतदार यंदा मतदानाचा हक्क बजावणार आहेत. गोव्यात विधानसभा निवडणुकीसाठी एकूण ११ लाख ५६ हजार ७६२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये ५ लाख ६२ हजार ७९० पुरुष तर ५ लाख ९३ हजार ९६८ महिला मतदार आहेत. तर ४ तृतीयपंथीही मतदानाचा हक्क बजावणार आहेत. गोव्यात एकूण ४० मतदारसंघ आहेत. या ४० मतदारसंघांसाठी एकूण ५८७ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यापैकी ३८२ उमेदवारी अर्ज वैध ठरले तर, १५३ अर्ज अवैध ठरले. यामध्ये ३४ जणांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले. त्यामुळे ३०१ उमेदवार आता रिंगणात आहेत. दक्षिण गोव्यातून १५४ तर उत्तर गोव्यातून १५६ उमेदवार भवितव्य आजमावणार आहेत.
कोणत्या पक्षाचे किती उमेदवार रिंगणात?
गोव्यात भाजपने सर्वाधिक ४० उमेदवार उभे केले आहेत. त्याखालोखाल आम आदमी पक्षाने ३९, रिव्होल्यूशनरी गोवन्स पार्टीने ३८, काँग्रेसने ३७, तृणमूल काँग्रेसने २६, राष्ट्रवादी आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने प्रत्येकी १३, शिवसेनेने ११ आणि अपक्ष ६८ उमेदवारांचे भवितव्य पणाला लागले आहे.
हेही वाचा - Goa Election 2022 : सगळी गणितं बिघडवणारी 'गोव्याची निवडणूक' जाणकारांच्या नजरेतून...