नाशिक - शहरातील भाविक सोसायटीतील एका घराला आग लावण्याचा प्रकार मंगळवारी (11 ऑगस्ट) दुपारी घडला होता. त्यात दोन महिला गंभीररित्या भाजल्या होत्या. त्यातील भारती आनंद गौड (वय ५८, रा.भाविक सोसायटी, शिंदेनगर, पंचवटी) या महिलेचा उपचारादरम्यान अखेर मृत्यू झाला आहे. रिक्षाचालक सुखदेव गुलाब कुमावत याने ही आग लावली होती. पोलिसांनी रिक्षाचालकाच्या विरोधात जिवे मारण्याचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाल्याने आता त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रिक्षाचालकाच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल -
भाविक सोसायटीतील ए विंगमध्ये राहणाऱ्या प्रदीप ओमप्रकाश गौड (वय ३९) यांच्या घरात मंगळवारी त्यांच्या मावशी भारती गौड आल्या होत्या. दुपारी बाराच्या सुमारास या कुटुंबाच्या परिचयाचा रिक्षाचालक सुखदेव कुमावत हा हातात दोन पेट्रोलच्या बाटल्या घेऊन घरी आला. त्याने घरात असलेल्या भारती गौड यांना मारहाण केली आणि सोबत आणलेल्या बाटल्यातील पेट्रोल टाकून आग लावून तो फरार झाला होता. त्यावेळी घरात प्रदीप यांची आई सुशिला गौड, मावशी भारती गौड, आजोबा जानकीदास गौड, पार्थ गौड व चिराग गौड हे होते. पार्थ हा अभ्यास करीत असताना हॉलमध्ये झालेल्या भांडणाचा आवाज व लागलेली आग बघून त्याने बेडरुमचा दरवाजा बंद केला आणि त्याच्या आई-वडीलांना फोन करून घटनेचे माहिती दिली.
दोन्ही बहिणी भाजल्या होत्या -
या आगीत सुशिला गौड व भारती गौड या दोघी भगिनी भाजल्या होत्या. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. या उपचारादरम्यान भारती गौड यांचा मृत्यू झाला. या प्रकरणातील संशयीत रिक्षाचालक सुखदेव कुमावत यांच्या विरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात जिवे मारण्याचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल होता. आता त्याच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेत सुखदेव कुमावत हा देखील भाजलेला असून, त्याला आणि भाजलेल्या महिलांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, अशी माहिती पंचवटी पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा - धक्कादायक : रिक्षाचालकाने पेट्रोल टाकून दोन महिलांना जाळले, महिलांची प्रकृती चिंताजनक