नागपूर- गाड्यांच्या काचा फोडून आणि अनेक दुकानांमध्ये तोडफोड करून दहशत माजवु पाहणाऱ्या गुंडांना गणेशपेठ पोलिसांनी अटक केली आहे. गुंडांच्या टोळक्याने केलेल्या तोडफोडीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अशा गुंडांची भीती नाहीशी व्हावी, या उद्देशाने पोलीस उपायुक्त राहुल माखनिकर यांनी अटक केलेल्या आरोपींना थेट जनता दरबारात सादर करून त्यांना बेइज्जत केले. त्यामुळे लोकांमधील भीती कमी होण्यास मदत होणार आहे.
सोमवारी रात्री दहशत पसरविण्यासाठी गुंडांच्या टोळक्याने गणेश पेठ पोलीस ठाणे हद्दीत रेल्वे स्टेशनच्या मागच्या बाजूला असलेल्या हॉटेलमध्ये पहाटेच्या वेळी हॉटेल मध्ये आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली होती. त्यानंतर त्यांची आपला मोर्चा सेवा सदनकडे वळवून त्या ठिकाणी अनेक वाहनांची तोडफोड केली. तलवार चाकू सारखे शस्त्र त्यांच्या हातात होते. दहशत माजविण्यासाठी ते शिवीगाळ सुद्धा करत होते. या प्रकरणाला नागपूर पोलिसांनी गांभिर्याने घेत सहा आरोपींची नावे निष्पन्न केली. त्यापैकी दोघांना अटक केली असून इतरांचा शोध घेतला जात आहे.
मात्र, या प्रकरणा मुळे परिसरात चांगलीच दहशत पसरली आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण राहू नये यासाठी पोलिसांनी अनोखी शक्कल लढवली. अटक आरोपींना त्याच चौकात नेऊन डीसीपी राहुल माणकीकर यांनी नागरिकांना आवाहन केले की तुम्ही अशा गुंडाना घाबरू नका. यांची माहिती पुढे येऊन आम्हाला द्या, आम्ही यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करू. कायद्यात असेल ती कारवाई यांच्यावर होईल, त्यामुळे कोणीही घाबरून राहण्याची गरज नाही. असे त्यांनी आवाहन केल आणि नागरिकांनी सुद्धा चांगला प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले.