नागपूर - संचारबंदीची घोषणा केल्यानंतर लाखो मजूर आणि कामगार राज्यात अडकून पडले आहेत. नागपुरात सुद्धा हजारो कामगारांना पलायन करण्यापासून थांबवण्यात आले आहे. त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यासाठी महापालिकेने शेल्टर होम तयार केले आहेत. या नागरिकांचे आरोग्य सदृढ राहण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी पोलिसांनी विशेष योगाचा वर्ग सुरू केला आहे.

शहरातील शेल्टर होममध्ये हजारोंच्या संख्येने कामगार आणि मजुरांना थांबवण्यात आले आहे. आता तर संचारबंदीचा कालावधी 3 मे पर्यंत वाढवण्यात आल्याने मजूर वर्गात अस्वस्थता पसरली आहे. गेल्या 24 दिवसांपासून हे मजूर शेल्टर होममध्ये राहत असल्याने त्यांना घराची चिंता सतावत आहे. ते पलायन करू नये, यासाठी नागपूर पोलिसांनी पुढाकार घेतला आहे.

या सर्वांना निरोगी राहता येईल, यासाठी सकाळी योगासने सुरू करण्यात आली आहेत. ज्यामध्ये शेकडो कामगार आणि मजूर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून योगा करत आहेत. योगा केल्याने मनावरील ताण कमी होऊन निरोगी राहण्यास मदत मिळत असल्याची माहिती येथील नागरिक व्यक्त करत आहेत.