नागपूर - बजरंगबलीसारखा छाती फाडून दाखवू शकत नाही की कोणाला मतदान केले आणि कोणाला नाही. मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार मतदान केले. पण, मी संजय राऊत ( MP Sanjay Raut ) यांचे काही खाल्ले नाही. त्यामुळे आम्हाला गद्दार म्हणायचा राऊत यांना काहीच अधिकार नाही, अशी प्रतिक्रिया अपक्ष आमदार देवेंद्र भुयार ( MLA Devendra Bhuyar ) यांनी मांडली संजय राऊत यांनी गद्दारी असल्याचा आरोप केला होता. नागपूर विमानतळावर मुंबईला रवाना होण्यापूर्वी माध्यमांशी बोलत होते.
सुरुवातीपासून महाविकास आघाडीसोबत होतो. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार मतदान केले. पण, अशा पद्धतीने आरोप होत असेल तर चुकीचे आहे. आज शरद पवार यांनी वेळ दिली आहे. त्यांना भेटण्यासाठी मुंबईला चाललो आहे, असे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार म्हणाले. शिवसेनेचे नेते संजय राऊत निवडणुकीनंतर महाविकास आघाडी सोबत आले. पण, मी त्यांच्या आधीपासूनच महाविकास आघाडीसोबत आहेत. त्यामुळे गद्दार हा शब्द आम्हाला लागू होत नाही. पहिले मत मी संजय पवारांना दिले तर दुसऱ्या पसंतीची मते संजय राऊत यांना दिले. आता मी हे काही छाती फाडून दाखवू शकत नाही. पण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेप्रमाणे मी हे मतदान केल्याचेही देवेंद्र भुयार यांनी सांगितले.
खासदार संजय राऊत यांनी 'असा' तर्क लावला असावा - संजय पवार मागे पडले असेल तर त्यात दोष आमचा नाही. तेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भातील नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे संजय राऊत यांनी माझ्यावर आरोप केला असेल तर ते चुकीचे आहे. माझ्या मतदारसंघात झुंज प्रकरणात लोक मृत्युमुखी पडले आणि मुख्यमंत्र्यांनी दखलही घेतली नाही. मी वारंवार फोन लावले पण उत्तर मिळाले नाही. त्यामुळे ही नाराजी बोलून दाखवली होती. खासदार संजय राऊत यांनी नाराज असल्याचा तर्क लावला. याबाबत चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी वेळ दिली असून या संदर्भात चर्चा करण्यासाठी मुंबईला जात असल्याचे आमदार भुयार यांनी सांगितले.
मुख्यमंत्री नाही तर दाऊदला सांगायचे का? - मुख्यमंत्री हे आमचे कुटुंब प्रमुख आहेत. मी त्यांना नाही तर दाऊद इब्राहिमला सांगायचे का, असा सवाल भुयार यांनी उपस्थित केला. त्यांना माझी नाराजी सांगितली. संत्रा प्रक्रिया प्रकल्प, असो झुंज प्रकरणात लोकांचा मृत्यू झाल्यानंतर असून त्यात वीस ते पंचवीस फोन करूनही त्यावर काही उत्तर मिळाले नाही. पण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन करताच त्यांनी दखल घेतली. त्यांच्या सूचनेनुसार मी मतदान केले आहे. त्यामुळे आमच्यावर अविश्वास दाखवायचा हे योग्य नाही. संजय राऊत यांना ही भेटणार आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार आहे, असेही भुयार यांनी सांगितले.
पुढील काळात विचार करावा लागेल - पण, अपक्ष आमदार म्हणून आम्हाला विचार करावा लागणार आहे. त्यामुळे येत्या काळात राष्ट्रपतीची निवडणूक आहे विधान परिषदेच्या निवडणुका आहेत. त्यावेळी आमची बदनामी होत असेल तर त्यासाठी विचार करावा लागणार आहे, असा इशाराही आमदार भुयार यांनी दिला आहे.