भंडारा : दोन चिमुकल्या भावंडांचा सर्पदंशाने मृत्यू ( Death of two siblings due to snakebite ) झाल्याची दुर्दैवी घटना मोहोडी तालुक्यातील देव्हाडा खुर्द येथे घडली. या घटनेची माहिती होताच शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी देव्हाडा खुर्द येथे धाव घेतली. या घटनेमुळे देव्हाडा खुर्द गावात शोककळा पसरली आहे.
असा झाला सर्पदंश : घरात झोपलेल्या दोन भावंडांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मोहाडी तालुक्यातील देव्हाडा खुर्द येथे घडली. या घटनेची माहिती होताच शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी देव्हाडा खुर्द येथे धाव घेतली आहे. सुशील बलवीर डोंगरे ८ वर्षे व उत्कर्ष बलवीर डोंगरे ११ वर्षे असे मृत भावंडांचे नाव आहे. रविवारी रात्री ते एकाच बिछान्यावर झोपी गेले होते. रात्री मागच्या दारातून साप आत आला. तो बिछान्यावर चढला. त्या सापाने दोघाही भावाना दंश केला.
उपचारासाठी शासकीय रुग्णालयात : काहीतरी चावल्याचा भास झाला. साप चावल्याचे माहित होताच दोघाही भावांना उपचारासाठी आधी तुमसर येथील शासकीय रुग्णालयात ( Tumsar Government Hospital ) नेण्यात आले होते. त्यानंतर त्या दोनही भावांना भंडारा येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. भंडारा येथे उपचारादरम्यान थोरला भाऊ उत्कर्ष बलवीर डोंगरे याचा रात्री १२.४५ वाजता मृत्यू झाला. तर धाकटा भाऊ सुशील बलवीर डोंगरे याला भंडारा येथून रात्रीच नागपूर येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्याचा सोमवारी सकाळी ९.३० वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे देव्हाडा खुर्द गावात शोककळा पसरली आहे. या घटनेची माहिती होताच मोहाडी पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी विनोद चरपे यांनी सकाळी देव्हाडा खुर्द गाठले आहे.