मुंबई - मध्य रेल्वे मार्गवरील काही दिवसांपूर्वी लुडो गेमवरून हाणामारी झाल्याची घटना घडली होती. आता पुन्हा एकदा दोन तळीरामांनी लोकल ट्रेनमध्ये (Mumbai Local Train) राडा घालत दारूच्या नशेत सहप्रवाशाला कंबरेच्या पट्ट्याने मारहाण केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दादर रेल्वे पोलीस ठाण्यात (Dadar Railway Police) या दोन दारुड्यांविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. शंबुक संकल्पना उदय (रा.कल्याण) आणि राहुल रामदास गजरे (रा.जोगेश्वरी) अशी या दोन दारू पिऊन हुल्लडबाजी करणाऱ्या तरूणांची नावे आहेत.
नेमकं काय आहे प्रकरण - रविवारी सायंकाळी 5 च्या सुमारास मध्य रेल्वेच्या ठाणे मार्गाने सीएसएमटीच्या दिशेने येणाऱ्या लोकलमध्ये दोन दारुड्या तरुणांनी धिंगाणा घातला. दारूच्या नशेत ते सर्वांना शिव्या देत होते. त्यातील एकाने रेल्वे डब्यातच उलट्या केल्या. याचा जाब विचारणाऱ्या व्यक्तीला दोन्ही दारुड्यांनी कंबरेच्या पट्ट्याने मारहाण केली. या दोन्ही दारू पिलेल्या तरूणांविरोधात दादर रेल्वे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंबुक संकल्पना उदय (रा.कल्याण) आणि राहुल रामदास गजरे (रा.जोगेश्वरी) अशी या दोन दारू पिऊन हुल्लडबाजी करणाऱ्या तरूणांची नावे आहेत. त्यांनी ठाण्यात राहणाऱ्या उत्तम पोंगडे यांना दारूच्या नशेत मारहाण केली.
सहप्रवाशाला जबर मारहाण - दारुच्या नशेत धुंद असलेल्या शंबुक याने सायन रेल्वे स्टेशन येण्यापुर्वी रेल्वे डब्यात उलटी केली. त्याचा मित्र राहुल गजरे हा त्यावेळेस दरवाज्याजवळ उभा होता. उलटी करणाऱ्या शंबुकला बाहेर घेऊन जा असे सहप्रवाशांनी राहुलला सांगितले. त्यानंतर दोघेही सर्व प्रवाशांना शिव्या देऊ लागले. शिव्या का देता? असा जाब प्रवासी उत्तम पोंगडे यांनी विचारला असता, हा राग घेऊन दोघांनी मिळून उत्तम यांना जबर मारहाण केली. परेल रेल्वे स्थानकावर राहुल गजरे याने फिल्मीस्टाईलने उत्तम यांचे डोके स्वत:च्या डोक्यावर आपटले. उत्तम यांच्या डोक्याला जखम हेऊन त्यातून रक्त आले. स्थानकांवर असलेल्या पोलिसांनी दोन्ही तरूणांना ताब्यात घेतले. उत्तम पोंगडे यांना रूग्णवाहीकेतून उपचारासाठी पाठवले.