मुंबई : आघाडी सरकारमध्ये नारायण राणे यांच्यासारखे भित्रे मंत्री नाहीत. त्यामुळे कितीही भीती दाखवली तरी, कोणीही पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात जाणार नाही अशा शब्दांत अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी नारायण राणे यांना टोला लगावला आहे.
नारायण राणे यांनी आघाडी सरकारवर केलेल्या टीकेला नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "आघाडी सरकारमध्ये नारायण राणे यांच्यासारखे भित्रे मंत्री नाहीत. जे भित्रे होते त्यांनी आधीच पक्ष सोडलेला आहे. केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून कोणाच्याही मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करत असेल, तर आम्ही घाबरणार नाही. जे घाबरत होते त्यांनी पक्ष सोडलेला आहे. घाबरून ज्यांनी पक्ष सोडला त्यांना भाजपकडून काही बक्षीसही मिळालं असेल. महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे टिकेल. तसेच सत्तेत महाविकास आघाडी सरकार पंचवीस वर्षे राहील. ज्यांनी पक्ष सोडला त्यांना आता झोप येते. मात्र त्यांची झोप उडवण्याचे काम आता आम्ही करत आहोत" असं म्हणत नवाब मलिक यांनी नारायण राणे यांना खोचक टोला लगावला आहे.
राजकारण परिस्थितीनुसार बदलते
राजकारण हे परिस्थितीनुसार बदलत असतं. नारायण राणे काँग्रेसमध्ये असताना भारतीय जनता पक्ष त्यांना शत्रू वाटत होत. सातत्याने ते भारतीय जनता पक्षाच्या कारभारावर टीका करत होते. मात्र घाबरून ते भारतीय जनता पक्षात गेले. तिथे त्यांना सत्तेत वाटा मिळाला. त्यामुळे आता त्यांना आम्ही शत्रू वाटतो. पण राजकारण हे परिस्थितीनुसार बदलत असतं. त्यामुळे विरोधकांवर जाऊन खालच्या पातळीवर टीका करणे, केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरूपयोग करून विरोधकांवर कारवाई करणे तसेच तपास यंत्रणेचा वापर करून विरोधकांच्या मनामध्ये भीती निर्माण करण्याचं काम कधीही आघाडी सरकारने केलं नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने आता कितीही यंत्रणेचा वापर केला. तरी, महाविकास आघाडी सरकार मधील कोणतेही मंत्री किंवा नेते तुम्हाला घाबरणार नाहीत. पूर्ण मंत्रिमंडळ तुरुंगात जाण्यासाठी तयार आहे. मात्र नारायण राणे यांच्यासारखे घाबरून कोणीही पक्ष सोडणार नाही. असा इशारा नवाब मलिक यांनी भारतीय जनता पक्षाला दिला आहे.
राणेंची टीका
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर टीका केली. गद्दारी करून शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत हे सरकार बनवलं असल्याचं यावेळी नारायण राणे म्हणाले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे तसेच एनसीबी (अमली पदार्थ विरोधी पथक)ने केलेल्या काही कारवायांवर सातत्याने टीका करत आहेत. मात्र अशा कामांसाठी नवाब मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेसने सोडलं आहे. अशी टीका नारायण राणे यांनी केली.