मुंबई - मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना मिळालेल्या ईडीच्या नोटिशीनंतर राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. कायद्यावर विश्वास असेल तर सक्तवसुली संचालनालय (ईडी) असेल किंवा त्यांचा बाप, कर नाही त्याला डर कशाला? अशा शब्दात वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे.
येत्या 22 तारखेला राज ठाकरेंना चौकशीला हजर रहावे लागणार आहे. यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याचा मनसेचा प्रयत्न होता. राज्यभरातून मनसैनिक मुंबईत दाखल होऊन दादर ते ईडी ऑफिस असा लाँग मार्च काढण्याच्या तयारीत मनसे होती. तसेच याच दिवशी ठाणे बंदचे आवाहनही मनसेच्या स्थानिक नेत्यांनी केले होते. मात्र, राजगडावरून आदेश आल्याने बंदचे आवाहन मनसेने मागे घेतले. शिवाय बाळा नांदगावकर यांनीही ईडीवर मोर्चा काढू नये, असे म्हटले आहे.
विधानसभा जागा वाटपावर मुनगंटीवार म्हणाले, मित्रपक्षांसोबत योग्य वेळी चर्चा होईल. मित्र पक्षांशी योग्यवेळी चर्चा होणार असून ही चर्चा प्रेम भावनेने होईल. आमच्यात वादविवाद होणार नाही. तसेच धनंजय मुंडेंच्या वादग्रस्त विधानावर ते म्हणाले, विरोधी पक्षांच्या नेत्यांनी काय बोलावे हा त्यांचा अधिकार आहे, पण अशी भाषा माझ्या तोंडी कधीच येऊ नये हीच प्रार्थना. पूरपरिस्थितीवर संभाजीराजेंचे ट्विट आणि तावडेंच्या व्हायरल व्हिडिओवर बोलताना ते म्हणाले, कोण काय म्हणाले यापेक्षा जिथे चूक आहे ती चूक लक्षात आणली पाहिजे, असल्याचे त्यांनी म्हटले.