मुंबई - जाती-धर्माचे मुद्दे समोर आणल्याने विकासाचे मुद्दे बाजूला पडतात. याचा फायदा राजकीय पक्षांना निवडणुकात होत असतो. विकासाचे मुद्दे बाजूला सारण्यासाठी धार्मिक मुद्दे पुढे आणले जात असल्याचे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. 12 एप्रिलला कोल्हापूर उत्तरच्या जागेच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मात्र या पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावर कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळाला. काँग्रेससोबत जाऊन शिवसेनेने हिंदुत्व सोडले असल्याची टीका प्रचारादरम्यान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट शिवसेनेवर केली. तर भारतीय जनता पक्षाला सोडल असून, हिंदुत्वाला नाही. शिवसेनेचा एक नेता, एक झेंडा राहिलेला आहे. परिस्थितीनुसार शिवसेनेने कधीच हिंदुत्व बदललेले नाही, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांना लावण्यात आला आहे.
राज्यभरात मशिदीवर असलेल्या लाऊड स्पीकरचा मुद्दादेखील राजकीय वादात अडकलेला आहे. या मुद्द्यावर आधी भारतीय जनता पक्षाने आक्षेप घेत मशिदीवरील लाऊड स्पीकर कायद्यानुसार बंद आणली पाहिजे, याची मागणी केली. तर भारतीय जनता पक्षाच्या पाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही लाऊड स्पीकरचा मुद्दा उचलून धरला. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहिली तर, वाढती महागाई, बेरोजगारी, इंधनाचे रोज वाढणारे दर या मुद्दा व्यतिरिक्त राजकीय पक्ष धार्मिक मुद्यांना अधिक महत्त्व देताना दिसत आहे. त्यामुळे राज्यात होणाऱ्या महानगरपालिका निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका किंवा विधानसभांच्या निवडणुकामध्ये देखील विकासाच्या मुद्याला महत्त्व राहणार आहे का? केवळ धार्मिक मुद्द्यांचा आधार घेत निवडणुका लढल्या जातील अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.
'जाणून-बुजून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न' : काही राजकीय नेत्यांकडून जाणून-बुजून भडकावू भाषण दिले जात आहे. या भाषणातून जातीय तडे निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. वाद निर्माण करण्यासाठी लोकांना उत्तेजित केले जात आहे. मात्र, लोकांनी संयम ठेवावा. तसेच, या प्रकरणांमध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करणार, असा इशारा गृहमंत्र्यांकडून देण्यात आला आहे. राजकीय फायद्यासाठी हिंदू - मुस्लीम समाजामध्ये वाद निर्माण केले जात आहे. याचा समाजावर विपरीत परिणाम होत आहे. विकासाचे मुद्दे बाजूला ठेवून धार्मिक मुद्द्याचा अजेंडा काही पक्षाकडून राबवल्या जात असल्याचा आरोप खुद्द गृहमंत्र्यांकडून केला गेला आहे.
'निवडणुका डोळ्यासमोर ठेवून धार्मिक मुद्द्यांचा वापर' : नुकत्याच पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल लागला आहे. पाच राज्यांपैकी चार राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला यश मिळाले. खास करून उत्तर प्रदेशमध्ये देखील निवडणूक प्रचारादरम्यान भारतीय जनता पक्षाने हिंदुत्वाच्या मुद्यावरच जोर दिला होता. सध्या महागाईचा आगडोंब उसळला आहे. इंधन, गॅस, तेलाच्या किमती गगनाला भिडले असताना, यावर भारतीय जनता पक्षाचा चकार शब्दही काढत नाही. विकासाच्या मुद्द्याला बाजूला ठेवत हिंदुत्वाचा मुद्दा समोर आणला जातो. निवडणुकाच्या वेळांमध्ये हे मुद्दे बाहेर काढल्यानंतर सामान्य नागरिकांना जीवनश्यवक मुद्द्यापासून दूर नेता येत. हे राजकीय पक्षांना चांगलेच माहिती आहे. वाढत्या महागाईला केंद्र सरकारने उत्तर देणे अपेक्षित आहे. मात्र तसे न होता जेथे ही निवडणुका होतात तेथे धार्मिक मुद्द्यांमध्ये हात घातला जातो. महाराष्ट्रातली सध्या राजकीय परिस्थिती पाहिली तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकात किंवा महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक न लढवता धार्मिक मुद्दे निवडणुकीच्या काळात समोर आणले जातील असे मत राजकीय विश्लेषक प्रविण पुरो यांनी व्यक्त केला आहे.
'मतांच्या राजकारणासाठी धार्मिक मुद्दे' : केवळ मतांच्या राजकारणासाठी धार्मिक मुद्दे समोर आणले जात आहेत. सामान्य जनतेच्या प्रश्नांवर न बोलता भारतीय जनता पक्ष तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना मशिदीवर लागलेल्या लाऊड स्पीकरचा मुद्याला महत्त्व देतात. सध्या जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडत आहेत. यावर भारतीय जनता पक्ष काहीही बोलत नाही. केवळ मतांसाठी राजकारण कोणत्या पातळीला चालल आहे, अशी खंत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडून व्यक्त करण्यात येते आहे.
हेही वाचा - Raj Thackeray In Thane :आज ठाण्यात 'राज'यांची तोफ कडाडणार! मनसे'कडून सभेची जोरदार तयारी