मुंबई - मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया तलावांमध्ये मुबलक पाणीसाठा झाल्याने महापालिकेने शहरातील पाणीकपात रद्द केल्याचे जाहीर केले आहे. यंदा सर्वत्र मान्सून उशीरा आल्याने राज्यभर पाणी कपातीचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला होता. तसेच गेल्या वर्षी परतीचा पाऊस न झाल्याने शहरावर पाणीसंकट उभे राहिले होते. मुंबई महापालिका व उपनगर भागात पालिकेच्या वतीने १० टक्के पाणी कपात करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतू, यंदा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुलशी या सातही तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडल्याने तलावांच्या पाणी पातळीत गेल्या काही दिवसात चांगलीच वाढ झाली आहे.
पहिल्या पावसातच तलावांमध्ये ५१ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाल्याने मुंबई महानरपालिकेने शहर हद्दीतील पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत गतवर्षी नोव्हेंबर महिन्यापासून 10 टक्के पाणी कपात सुरू होती. आता पालिकेने हा निर्णय मागे घेतल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.
असाच जोरदार पाऊस सुरू राहिल्यास शहराला एक वर्ष पुरेल इतका पाणीसाठा या ७ तलांवमध्ये जमा होईल, अशी अपेक्षा महापालिकेच्या जल विभागाने केली आहे.