मुंबई - महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर जातीपातीच्या राजकारणाला सुरुवात झाली, असा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले होते. हे उत्तर मानसेच्या जिव्हारी लागल्याचे दिसत आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी राष्ट्रवादीवर जातीपातीच्या राजकारणाच्या मुद्द्यावरून हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असल्याची टीका त्यांनी केली आहे.
'प्रबोधनकारांचे लिखाण वाचावे'
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर दिले होते. राज ठाकरे यांच्यावर न बोललेले बरे. त्यांना माझा सल्ला आहे, की त्यांनी प्रबोधनकारांचे लिखाण वाचावे. प्रबोधनकारांचे लिखाण त्यांना योग्य मार्ग दाखवेल, असा टोला शरद पवार यांनी लगावला होता. हा टोला मनसेच्या जास्तच जिव्हारी लागला आहे. यावर आता देशपांडे यांनी ट्विट करत राष्ट्रवादीवर पलटवार केला आहे.
'राष्ट्रवादीचे राजकारण संकुचित'
राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचे आणि संकुचित राजकारण करायचे, हे महाराष्ट्र गेले २० वर्ष पाहत आहे. राष्ट्रवादीने जे केले ते राज ठाकरे बोलले आहेत. यात चुकीचे काही नाही, असे संदीप देशपांडे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
संभाजी ब्रिगेडनेदेखील केली होती मनसेवर टीका
राज ठाकरे यांनी अलीकडेच राजकारणातील जातीयवादावर भाष्य केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसमुळे राज्यात जातीय अस्मिता टोकदार झाली. जेम्स लेनला मराठा तरुण-तरुणींपर्यंत कुणी पोहोचवले, असा सवालही त्यांनी केला होता. राष्ट्रवादीबरोबरच त्यांचा रोख संभाजी ब्रिगेडकडे होता. राज यांच्या या वक्तव्याला प्रवीण गायकवाड यांनी सविस्तर फेसबुक पोस्ट लिहून उत्तर दिले होते. राज ठाकरे म्हणजे राजकारणात सपशेल अपयशी ठरलेला माणूस आहे. त्यांना बाबासाहेब पुरंदरे यांच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही. त्यांना इथल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संघर्षाचेही आकलन नाही. पुरंदरेंनी जेम्स लेनच्या पुस्तकाचा प्रचार का केला, हा प्रश्न विचारण्याचे धाडस राज ठाकरेंनी दाखवावे,' असे आव्हानही गायकवाड यांनी दिले आहे. प्रबोधनकार ठाकरे यांच्या लिखाणाचा अभ्यास करण्याचा सल्लाही त्यांनी राज यांना दिला आहे.