मुंबई - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवला आहे. काही लोकांना वाटत ते म्हणजे महाराष्ट्र आहे. मात्र, ते म्हणजे महाराष्ट्र नाही. अठरा पगड जाती म्हणजे महाराष्ट्र, ही आठवण करुन द्यायची वेळ आली आहे. पण, तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही. हिंदुत्व म्हणजे व्याख्या आहे. जुनी संस्कृती आहे. बाबरी मशीद पाडली तेव्हा कुठल्या बिळात होते. ढाचा पाडायच्या वेळी मी तिथेच होतो. तेव्हा एकही शिवसेनेचा नेता गेला नाही, अशी घणाघाती टीका फडणवीसांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर केली ( Devendra Fadnavis criticizes cm uddhav thackeray ) आहे.
शिवसेनेची सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीला मांडी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालीसा पठण करणार, असे म्हटल्यामुळे राणा दांपत्याला अटक करण्यात आली. हनुमान चालीसा म्हटल्यामुळे रामाची सत्ता उलटणार होती? का रावणाची सत्ता उलटणार होती? हे उद्धव ठाकरे यांनी एकदा सांगावे. रामाचा जन्म झाला नाही, असे म्हणणाऱ्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून शिवसेनेने सत्ता स्थापन केली असल्यामुळे त्यांना आता रामाचा विसर पडला आहे. तसेच, पाकिस्तानने इशारा दिल्यामुळे काश्मीरमध्ये मेहबूबा मुक्ती यांच्या सोबत भाजपाने सरकार बनवल होती. मात्र, परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर लगेचच त्या सत्तेला लाथ मारण्याचे काम हे भाजपने केले असल्याचे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणातून दिले.
14 मे नंतर पोलखोल सभा घेणार - उद्धव ठाकरेंनी मुंबई 14 मे ला सभा घेऊन सर्व विरोधकांना उत्तर देणार असल्याचा इशारा दिला आहे. पण, आज भारतीय जनता पक्षाने घेतलेली सभा म्हणजे पोलखोल सभा नाही. आपण 14 मेच्या नंतर सभा घेऊन पोल-खोल सभा करणार असल्याचा इशारा या भाषणातून देवेंद्र फडणीस यांनी मुख्यमंत्र्यांना दिला. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवूनच पंचवीस वर्ष मुंबई शिवसेनेकडे आम्ही दिली होती. मात्र, शिवसेनेने महानगरपालिकेत प्रचंड भ्रष्टाचार केला आहे. सामान्य मुंबईकरांचा पैसा शिवसेनेने लुटला. सामान्य मुंबईकरांच्या कष्टाच्या पैशाची किंमत भाजप कडून केली जाईल. त्यामुळे मुंबईकरांनी येणाऱ्या महानगरपालिकेसाठी सज्ज व्हावे. शिवसेनेच्या विरोधात लढण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन देवेंद्र फडणीस यांनी या सभेतून केल आहे. तसेच, मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांना विरोधकांवर तुटून पडण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही इंदिरा गांधी यांना घाबरले नाही. आम्ही कोणाला घाबरत नाही, मात्र अंगावर येईल त्याला सोडत नाही, असा इशारा आपल्या भाषणातून शिवसेनेला देवेंद्र फडणीस यांनी दिला आहे.
ठाकरे सरकारने राज्य अधोगतीकडे नेले - कोविडच्या काळात महाविकास आघाडी सरकारने सर्वसामान्य जनतेला उघड्यावर सोडलं होतं. मात्र कोविडचा काळ संपत आल्यावर लगेच राज्य सरकारने बिल्डर आणि व्यवसायिकांना मोठी मदत केली. मात्र, सामान्य नागरिकांना कोणतीही मदत राज्य सरकार कडून करण्यात आली नाही. कोविड काळातही मोठा भ्रष्टाचार राज्य सरकारने केला. इंधनावरचे दर राज्य सरकार कमी करत नाही.मात्र विदेशी मद्यावरचे कर कमी करून राज्य सरकारने बेवड्यासाठी सुविधा केली असल्याचा टोमणाही देवेंद्र फडणीस यांनी लगावला. राज्य सरकारचे दोन मंत्री तुरुंगात आहेत. नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयावर तुरुंगात असलेले मंत्री नवाब मलिक यांचा फोटो लावण्यात आला. मंत्री नवाब मलिक जेलमधून राज्य सरकारचे काम करत आहेत का?, असा उपरोधक टोला देखील त्यांनी लगावला आहे.
हेही वाचा - Raj Thackeray : शरद पवारांनी जाती-जातीमध्ये भेद निर्माण केले; राज ठाकरेंची बोचरी टीका