मुंबई - काँग्रेसचे नवनिर्वाचित महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या पाठोपाठ ऊर्जामंत्री नितीन राऊतही दिल्लीला पोहचले आहेत. राज्यात दुसऱ्या उपमुख्यमंत्री पदासाठी दिल्लीत जोरदार तयारी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नितीन राऊत यांचे ऊर्जा खाते नाना पटोले यांच्याकडे दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर नितीन राऊत यांना उपमुख्यमंत्री पद देऊन काँग्रेसकडे आलेल्या खात्यांपैकी एक खाते देऊन खांदे पालट करण्याची संभावना आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ होताना दिसणार आहे.
हेही वाचा - पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर भावूक झाले होते गुलाम नबी आझाद, मागितली माफी; पाहा व्हिडिओ...
ऊर्जामंत्री नितीन राऊत दिल्लीत -
नुकतंच नाना पटोले यांच्याकडे काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा दिली. मात्र, त्यासोबतच त्यांच्याकडे ऊर्जा मंत्रालय देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. सध्या नितीन राऊत यांच्याकडे असलेले ऊर्जा मंत्रालय नाना पटोले यांच्याकडे जाणार आसल्याने नितीन राऊत यांना उपमुख्यमंत्री पद आणि इतर खात्यांपैकी एक खाते देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
लवकरच या संबंधी दिल्लीतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहेत. मात्र, अद्याप काँग्रेस नेते, शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात या विषयी चर्चा झालेली नाही. तसेच नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता हे पद तीनही पक्षासाठी खुले झाल्याचं सांगत काँग्रेसच्या या निर्णयाबद्दल शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे काँग्रेसच्या या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना काय प्रतिक्रिया देणार यावरही बरेच काही अवलंबून असणार आहे.
हेही वाचा - आप नेत्या प्रीती शर्मा मेनन यांचे सचिन तेंडुलकर यांना खुले पत्र