मुंबई - जागतिक स्तरावरील शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार रणजितसिंह डिसले यांना मिळाला याबद्दल अभिमान असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले आहेत. डिसले यांच्यासारखे नाविन्यपुर्ण उपक्रम राबवून शिक्षण क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग राबविणाऱ्या राज्यातील शिक्षकांना सोबत घेऊन शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत अव्वल दर्जाचे शिक्षण पोहचविण्यासाठी आराखडा तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्याच्या हस्ते युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार मिळालेल्या रणजितसिंह डिसले यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, डिसले यांना हा पुरस्कार मिळाला नसून त्यांनी आपल्या शिक्षण क्षेत्रातील उत्तम कामाने हा पुरस्कार मिळविला आहे. यावरच ते थांबले नसुन त्यांनी पुरस्काराची रक्कम या स्पर्धेतील इतर नऊ स्पर्धकांमध्ये वाटून दिली आहे. त्यांनी केलेले कार्य हे ध्येय्यवेडाचे उदाहरण आहे. डिसले यांची शिक्षणक्षेत्रात काम करण्याची तळमळ यातून दिसून येते. कोविडनंतर शिक्षण क्षेत्रात अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. मुंबई महानगरपालिकेतील शाळांमधून व्हर्च्युअल क्लासरूम ही संकल्पना राबविली गेली होती, याच धर्तीवर कोविडनंतरचे शिक्षण राज्यातील शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत पोहचविण्यासाठी डिसले यांच्यासारख्या तंत्रज्ञानस्नेही आणि नाविन्यपुर्ण विचार करणाऱ्या शिक्षकांची मदत घेऊन शिक्षण विभागाने काम करावे असेही त्यांनी यावेळी सुचविले.
जिल्हा परिषदेच्या शाळांतील शिक्षकांचे उत्तम काम - उपमुख्यमंत्री
सोलापूरसारख्या दुष्काळी समजल्या जाणाऱ्या भागातील जिल्हा परिषदेतील शिक्षकाने हा पुरस्कार मिळविला ही खरच अभिनंदनीय बाब आहे. या शाळांमधील काम उत्तम आहे याचा दाखला या पुरस्काराच्या रुपाने मिळाला आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री म्हणाले, तंत्रज्ञानातील नाविन्यपुर्ण प्रयोग व असामान्य कार्य यामुळे जगातील सर्वोत्तम शिक्षकांच्या क्रमवारीत ते आले आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षकाचा ग्लोबल चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी तयार केलेली क्यु आर कोडेड पुस्तके राज्यातील एक कोटीहून अधिक मुले वापरत असून जगभरातील देशातील शाळांमध्ये याची अंमलबजावणी सुरु आहे. विद्यार्थ्यांसाठी अधिक आनंददायी आणि ज्ञानवर्धक शिक्षण कसे देता येईल यासाठी शालेय शिक्षण विभागाने त्यांच्या ज्ञानाचा वापर करावा असेही पवार यांनी सांगितले.