मुंबई - राज्यामध्ये महिलांवर अत्याचार वाढत चालले आहेत. नवरात्रीच्या उत्सवात देखील महिलांवर अत्याचार कमी झालेले नाहीत. पुणे आणि पालघरमध्ये अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून त्यांच्यावर कोणत्याने वार करण्यात आले. अशी परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे. त्यामुळे महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर येणाऱ्या व्यक्तीने महिलांना न्याय देण्यासाठी काम केले पाहिजे. समाजात अनेक रावण फिरत आहेत. त्या रावणाना साथ देणारी शूर्पणका नको, असे ट्विट मी केले. हे ट्विट करत असताना कोणत्याही व्यक्तीला उद्देशून ते ट्विट केलेले नाही, असे स्पष्टीकरण भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी मुंबईत पत्रकार परिषदेतून दिले. राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांना उद्देशून हे ट्विट केल्याची चर्चा सुरु होती. त्यानंतर वाघ यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. मात्र स्वतःहून कोणी शूर्पणका म्हणून आपल्या अंगावर लावून घेत असेल तर याबाबत आपल्याला कोणतीही माहिती नाही, असेही यावेळी चित्रा वाघ यांनी सांगितले.
'नेत्यांच्या बगलबच्यांवर अनेक केसेस'
महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या आजूबाजूला फिरणाऱ्या बगलबच्यांवर अनेक केसेस आहेत. त्यामुळे महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावर जी कोणी व्यक्ती बसेल. त्या व्यक्तींनी महिलांना न्याय देण्यासाठी काम केले पाहिजे. समाजात फिरणाऱ्या या रावणांना साथ देणारी शुर्पणका नको. या संदर्भात आपण ट्विट केल आहे. महिला आयोग अध्यक्षपदावर बसणारी व्यक्ती कोणत्याही पक्षाची नसते. त्या व्यक्तींनी सर्वसामान्य महिलेला न्याय देण्यासाठी काम करावे ही अपेक्षा आहे. राज्यातील महिला आयोग अध्यक्ष पदावर लवकरात लवकर नेमणूक व्हावी, यासाठी वेळोवेळी आंदोलन आणि निदर्शने केली असल्याचे आठवणही यावेळी चित्रा वाघ यांनी करून दिली.
हेही वाचा - पाटोदा ग्रामपंचायतचा अभिनव उपक्रम : प्लास्टिकमुक्त गाव करण्यासाठी ग्रामपंचायत घेत आहे प्लास्टिक विकत