मुंबई - मृत व्यक्तीच्या नावे बोगस कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी अटकेची टांगती तलवार असलेले भाजपाचे साताऱ्यातील माण खटावचे आमदार आणि जिल्हा अध्यक्ष जयकुमार गोरे यांनी अटक पूर्व जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन खंडपीठाकडे धाव घेतली आहे. त्यावरील युक्तिवाद मंगळवारी पूर्ण झाला असून त्यावर बुधवारी (आज) निर्णय अपेक्षित आहे.
काय आहे प्रकरण - खटाव तालुक्यातील मायणी येथील मातंग संमाजाचे मृत पिराजी भिसे यांची बोगस कागदपत्रे तयार करुन फसवणूक केल्याप्रकरणी भाजपाचे आमदार जयकुमार गोरे, दत्तात्रय कोंडीबा घुटूगडे, महेश पोपट बोराटे आणि अज्ञात दोघांवर दहिवडी पोलिस ठाण्यामध्ये महादेव भिसे यांनी तक्रार करून गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलीसांनी संजय काटकरला अटक केल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
गोरे यांचा जामिनासाठी अर्ज - गोरे यांनी अटकपूर्व जामीनसाठी वडूज न्यायालयात केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर गोरे यांनी उच्च न्यायालयात घाव घेऊन अटकपूर्व जामिनासाठी याचिका केली आहे. त्या याचिकेवर सुटीकालीन न्यायालयाचे न्या. नितीन सांबरे आणि न्या. अनिल पानसरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. गोरे यांचा या व्यवहाराशी कोणताही संबंध नाही असा युक्तीवाद करण्यात आला.
राजकीय हेतून गोवल्याचा मत - निव्वळ राजकीय हेतू आणि सूडबुद्धीने त्यांना गोवण्यात आल्याचे त्यांच्यावतीने अॅड. राजू पाटील आणि अॅड. संजीव कदम यांनी सांगितले. या जमीनीवर गोरे यांचा वैयक्तिक पातळीवर काहीही संबंध नाही. एका संस्थेचे पदाधिकारी असल्याने त्यांच्यावर आरोप करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला. या युक्तिवादाला विशेष सरकारी वकील अॅड. श्रीकांत गावंड यांनी आक्षेप घेतला. या प्रकरणाचे प्रमुख सुत्रधार आमदार गोरे असून गोरे त्यांच्या विरोधातील सर्व पुरावे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले असल्याचेही त्यांनी सांगितले. दोन्ही बाजू ऐकून घेत न्यायालयाने निर्णय राखून ठेवला.
गोरे यांच्यासह ४ साथीदारांविरोधात गुन्हा - दहीवडी पोलीस ठाण्यात महादेव पिराजी भिसे यांच्या तक्रारीवरून जयकुमार गोरे यांच्यासह अन्य चार साथीदारांविरुद्ध ऑट्रासिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. मायणी येथील छत्रपती शिवाजी महाराज एज्युकेशनच्या जागेत जाण्यासाठी गट नंबर 769 मधील अल्पभूधारक जो मयत आहे, त्याला जिवंत दाखवून जमिनीचा दस्तावेज करून अल्पभूधारक कुटुंबाची फसवणूक केल्याचा गोरेंवर आरोप आहे. दहिवडीचे उपविभागीय पोलिस आधिकारी डॉ. निलेश देशमुख यांनी ही माहिती दिली आहे. माण खटाव काँग्रेसचा राजीनामा देऊन जयकुमार गोरे भाजपमध्ये दाखल झाले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याविरोधात सख्खे बंधू शेखर गोरे यांनी आव्हान दिले होते. भाजपने हा मतदारसंघ जयकुमार गोरेंसाठी मागितला होता तर शेखर गोरे यांना तिकीट देण्याची तयारी शिवसेनेने केली होती. सख्खे भाऊ एकमेकांविरोधात बाह्या सरसावून सज्ज झाल्याने विधानसभा निवडणुकीची लढत रंगतदार झाली होती.
हेही वाचा - Gore's pre-arrest bail: आमदार जयकुमार गोरे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला : बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आरोप