मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ( Maharashtra Public Service Commission ) रविवारला पार पडणारी पूर्व परीक्षा ( Pre-Exam ) पुढे ढकलण्याची घोषणा करताच परीक्षेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर ( Social Media ) टीकेचा भडीमार सुरु केला आहे. रागाच्या भरात अश्लील भाषेत टीका-टिप्पणी करणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात एमपीएससी प्रशासनाने ( MPSC Administration ) कठोर पवित्रा घेतला आहे. अश्लील टीकाखोर अर्जदारांवर कारवाई करण्याचा फतवाच एपीएससी प्रशासनाने प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार दोषी विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी किंवा विशिष्ट कालावधीसाठी परीक्षेला बसून देणार नाही. निवड प्रक्रियेतून बाहेर केल्या जाणार आहे. त्यामुळे आता जहाल भाषेत टीका केलेल्या विद्यार्थ्यांचे धाबे दणाणले आहेत.
- समाज माध्यमांवरून विद्यार्थ्यांची टीका
गेल्या वर्षीपासून कोरोनामुळे शासकीय सेवेतील भरती प्रक्रिया रखडली होती. याचबरोबर शासकीय सेवेसाठी परीक्षा सुद्धा होऊ शकल्या नाहीत. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच महाराष्ट्र लोक सेवा आयोगाने परीक्षा घेण्याचे ठरविले होते. त्यानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा परीक्षा 2021 अंतर्गत 390 पदांसाठी परीक्षा घेण्याचे निश्चित केले होते. या राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी 2 जानेवारी 2022 ला घेण्याचे ठरवले होते. या परीक्षेत अनेक उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ओलांडली गेली असल्यामुळे परीक्षेस बसण्याची संधी हुकली आहे. त्यामुळे अशा उमेदवारांना एक संधी मिळावी म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी समाज माध्यमावर नाराजी व्यक्त करत आयोगाचा ट्विटर अकाउंटवर संताप व्यक्त केला आहे. यादरम्यान असभ्य, असंस्कृत, असंसदीय व अश्लील भाषेतील टीका-टिपणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली.
- आयोगाच्या प्रसिद्ध पत्रकात काय म्हटले...?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आज (गुरुवारी) प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, आयोगाच्या कार्यपध्दतीविषयी आणि/अथवा काही निर्णयांविषयी नाराजी असणाऱ्या, तसेच आयोगाच्या काही निर्णयांमुळे प्रभावित होणाऱ्या उमेदवारांकडून आयोगाच्या निर्णयांवर जाहीर टीका-टिपणी करण्यात येते. काही विद्यार्थी आयोगावर टीका-टिपणी करत असताना शासकीय सेवेत येऊ इच्छिणाऱ्या भावी लोकसेवकांकडून सार्वजनिक सभ्यतेचे भान ठेवून संसदीय व सुसंस्कृत भाषा शैलीचा वापर केला जाणे अपेक्षित आहे. परंतु काही उमेदवारांकडून विविध प्रसारमाध्यमे समाजमाध्यमे यावर मत/अभिप्राय व्यक्त करताना किंवा दूरध्वनीवरुन संवाद साधताना असभ्य, असंस्कृत, असंसदीय व अश्लील भाषेचा वापर करण्यात येत असल्याची बाब आयोगाच्या प्रकर्षाने निदर्शनास आली. त्यामुळे आयोगाने याची गंभीर दखल घेण्यात येत असून अशा उमेदवार / व्यक्ती यांच्यावर संबंधित कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार आहे.

- अशी होणार कारवाई
एखादा उमेदवार एमपीएससीवर असभ्य, असंस्कृत, असंसदीय व अश्लील भाषेचा वापर करत असल्याची बाब आयोगाच्या प्रकर्षाने निदर्शनास आली तर, आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार आयोगामार्फत आयोजित सर्व परीक्षा व निवडीपासून संबंधिताला कायमस्वरुपी अथवा काही विशिष्ट कालावधीसाठी परीक्षेत बसू देणार नाही. त्यामुळे आता विद्यार्थ्यांनी आयोगावर टिप्पणी करत असताना भाषेचा वापर करताना तारतम्य पाळणे आवश्यक आहे.