कोल्हापूर- राजाराम तलाव परिसरात आज सकाळी अर्धवट आणि जळालेल्या अवस्थेत आज एका वृद्ध महिलेचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी अवघ्या काही तासांतच या खुनाचा छडा लावला आहे. संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. संतोष निवृत्ती परिट (वय 35, रा.राजलक्ष्मी अपार्टमेंट माळी कॉलनी, टाकाळा) असे या संशयित आरोपीचे नाव आहे.
राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजाराम तलाव येथील सरनोबतवाडीकडे जाणाऱ्या रोड लगत वृद्ध महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह दिसल्याची माहिती पोलीसांना आज सकाळी मिळाली होती. घटनेची माहिती मिळताच राजारामपुरी पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस अधिकाकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी अज्ञात आरोपीने वृद्धेची अमानुषपणे हत्या करून मृतदेह फेकून दिल्याचे दिसून आले.
हेही वाचा-बीडीडीतील 272 घरांच्या लॉटरीला काही संघटनांचा विरोध
पोलिसांनी वेगाने चक्रे फिरविली-
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ हालचाली सुरू करून आरोपीचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यासाठी पोलिसांनी 4 ते 5 वेगवेगळी पथके तैनात केली. तपासानंतर वयोवृद्ध महिलेचे नाव शांताबाई शामराव आगळे (वय 80, रा. पाचगाव) असल्याचे समोर आले. त्यानुसार त्यांच्या नातेवाईकांकडून पुन्हा खात्री करून घेतली. पोलिसांनी पुढील चौकशी केली असता संतोष निवृत्ती परिट याने देवकार्य करण्याचे बहाण्याने शांताबाई यांना 5 जानेवारी 2021 रोजी त्यांच्या घरातून घरी नेल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार संतोष निवृत्ती परिट याला काही तासांतच शोधून अटक केल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी सांगितले.

हेही वाचा-मोबाईल अभावी मुलीने आत्महत्या केल्याचा मुद्दा खासदार श्रीनिवास पाटलांनी मांडला लोकसभेत
अंगावरील सोने काढून घेऊन केली निर्घृण हत्या
संशयित आरोपी संतोष निवृत्ती परिट हा मागील 5 वर्षांपासून मृत शांताबाई शामराव आगळे आणि त्यांच्या परिवाराला ओळखत होता. कर्जबाजारी झाल्याने परिट मोठ्या आर्थिक संकटात होता. शांताबाई शामराव आगळे या सोन्याचे दागिने घालत असल्याबाबत त्याला माहिती होती. त्यामुळे दागिने लाटण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याची कबुली दिली. 5 फेब्रुवारी रोजी त्याने शांताबाई यांना देवकार्य करण्याचे बहाण्याने त्यांच्या घरातून आपल्या घरी नेले होते. त्यानंतर त्याने शांताबाई आगळे यांना जिवे ठार मारून त्यांचे अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले. दरम्यान, काही तासांतच पोलिसांनी या हत्येचा छडा लावल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे. दरम्यान, या गुन्ह्याचा तपास पोलीस उप अधीक्षक मंगेश चव्हाण करत आहेत.