औरंगाबाद - लॉकडाऊनच्या काळात तीन महिन्यापासून काम नसल्याने आर्थिक चणचणीत सापडलेल्या स्वयंपाकीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी मध्यरात्री राणानगरमधील चंदन अपार्टमेंटमध्ये घडली.
नाथा भाऊराव लोंढे (३९, मूळ रा. घनसावंगी, जि. जालना) असे मृताचे नाव आहे. नाथा लोंढे हे हॉटेलमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करायचे. त्यावरच त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह सुरू होता. मात्र, कोरोना महामारीमुळे गेल्या तीन महिन्यांपासून ते बेरोजगार होते. आर्थिक परिस्थितीशी सामना करावा लागत असल्याने नैराश्य आलेल्या लोंढे यांनी रविवारी मध्यरात्री घरातील पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला. हा प्रकार कुटुंबियांच्या लक्षात आल्यावर त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांना बेशुद्ध अवस्थेत घाटीत दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी पहाटे साडेचारच्या सुमारास त्यांना मृत घोषीत केले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अकस्मात मृत्यूची नोंद पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
हेही वाचा - भाच्याचा खून करणाऱ्या आरोपीला मामाने यमसदनी धाडले