औरंगाबाद : कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य सरकारकडून कठोर निर्बंधांसह प्रतिबंधात्मक नियम पाळण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र याला नागरिकांकडून केराची टोपली दाखविली जात असल्याचे भयावह वास्तव औरंगाबादेतून समोर आले आहे. औरंगाबादेतील जाधववाडी बाजारात बुधवारी सकाळी मोठी गर्दी बघायला मिळाली. त्यामुळे अशाने कोरोना कसा नियंत्रणात येणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
जाधववाडी मंडीत तुफान गर्दी
शहरातील मुख्य फळभाजी मार्केट असलेल्या जाधववाडी मंडीत बुधवारी सकाळी फळभाज्या विक्रेत्यांसह नागरिकांची तुफान गर्दी बघायला मिळाली. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाल्याचे चित्र बघायला मिळाले. सोशल डिस्टन्सिंगसह कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासनाने घालून दिलेले सर्व नियम नागरिकांनी धाब्यावर बसविल्याचेच चित्र यावेळी बघायला मिळाले. विशेष म्हणजे जाधववाडीत किरकोळ विक्रेत्यांना परवानगी नसतानाही फळभाज्या विक्रेते मोठ्या संख्येने येथे दिसून आले. शहर व जिल्ह्यात कोरोना संसर्ग वेगाने वाढत असताना नागरिकांच्या या गर्दीने कोरोना कसा नियंत्रणात येणार असा प्रश्न आता विचारला जात आहे. अनेक फळभाज्या विक्रेते तसेच नागरिक विना मास्क असल्याचे चित्रही यावेळी बघायला मिळाले. औरंगाबादमध्ये कोरोना बाधितांची संख्या लाखावर गेली असताना नागरिकांना नियमांचा विसर पडल्याने कोरोनासाठी अधिक कठोर निर्बंधांची गरज व्यक्त केली जात आहे.