अमरावती - ओबीसींना राजकीय आरक्षण (OBC Political Reservation) मिळावे ही भाजपाची भूमिका आहे. राज्याचे मुख्यमंत्री मात्र या विषयावर शांत बसले आहेत. सत्तेत असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसी आरक्षणासाठी मोर्चे आणि आंदोलन करीत आहेत आणि सत्तेत असणार काँग्रेस या राजकीय पक्षाचे ओबीसी मंत्री वडेट्टीवार आणि नाना पटोले यांच्या नेतृत्त्वात आंदोलन आणि चिंतन बैठक आयोजित करत आहेत. ज्या महाविकास आघाडीकडे सत्ता आहे त्यांनी प्रश्न सोडवायचा असतो, मात्र हा जो काही प्रकार सुरु आहे ते पाहून महाविकास आघाडी सरकार नाटक कंपनी चालवत आहे, असे वाटत असल्याचा आरोप भाजपाचे आमदार संजय कुटे यांनी केला आहे. आज (सोमवारी) आमदार कुटे अमरावतीत पत्रकार परिषदेत बोलत होते.
ओबीसींचे राजकीय आरक्षण गमाविण्याचा जो नाकर्तेपणा महाविकास आघाडी सरकारने दाखवला आहे. त्याचा निषेध म्हणून राज्यात 26 जूनला एक हजार ठिकाणी रस्ता रोको आंदोलन भाजपा करणार आहे. ओबीसींना राजकीय आरक्षण पूर्ववत मिळावा अशी मागणी या आंदोलनाद्वारे केली जाणार असल्याचे आमदार संजय कुटे म्हणाले. हे आंदोलन भाजपा आक्रमकपणे करणार असल्याचेही आमदार संजय कुटे यांनी स्पष्ट केले.
कार्यकर्त्यांची घेतली बैठक
26 जूनला होणाऱ्या आंदोलनाची रणनीती ठरविण्यासाठी शहर आणि जिल्हा भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आमदार संजय कुटे यांनी घेतली. यावेळी विधानपरिषद सदस्य आणि अमरावतीचे माजी पालकमंत्री प्रवीण पोटे, महापौर चेतन गावंडे, भाजपाच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता, शहर अध्यक्ष किरण पातूरकर आदी उपस्थित होते.