अमरावती - लॉकडाऊनच्या काळात आलेल्या अवाढव्य वीजबिलात सूट देण्याची घोषणा खुद्द ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली होती. तर आता वीजबिलात सूट न देता आता बिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याचे फर्मान वीजवितरण कंपनीने बजावले आहे. तर ऊर्जामंत्री म्हणतात, की राज्य सरकारने निर्णय घ्यावा. यावर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी वीज बिलावरून काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेसच्या मंत्र्यांचे सरकारमध्ये काही चालत नसून त्यांना काहीही सरकारमध्ये अधिकार नाहीत. त्यामुळे काम होत नसेल तर त्यांनी आपली जागा रिक्त करावी, असा टोला लगावला आहे. तर 50 टक्के वीजबिलात सूट देण्याची मागणी यावेळी नवनीत राणा यांनी केली.
'वीजबिलात सूट का नाही?'
कोरोनामुळे अनेक युवकांचे रोजगार गेल्याने ते बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे लोकांसाठी अन्नधान्य हे केंद्र सरकार व राज्य सरकार मिळून देण्यात आले होते. मग आता वीजबिलात का सूट देत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांची या सरकारमध्ये शून्य गिणती आहे का, असेही राणा म्हणाल्या.