नवी दिल्ली - केंद्र सरकारने कोरोनाच्या काळात गरिबांसाठी विक्रमी आर्थिक पॅकेज घोषित केल्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अभिभाषणात सांगितले. ते संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी बोलत होते.
अर्थव्यवस्था हाताळण्यासाठी सरकारने विक्रमी आर्थिक पॅकेज जाहीर केले. कोणताही गरीब व्यक्ती भुकेला राहू नये, यासाठी सरकारने खात्रीशीर प्रयत्न केल्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान गरीब कल्यान योजनेचे राष्ट्रपतींकडून कौतुक
पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतून ८ कोटी लोकांना प्रत्येकी ५ किलो धान्य प्रति महिना मिळाले आहे. हे धान्य ८ महिन्यांपर्यत मिळाल्याचे राष्ट्रपतींनी अभिभाषणात नमूद केले. केंद्र सरकारने स्थलांतरित मजूर, कामगार आणि घरांपासून दूर राहणाऱ्या लोकांची काळजी घेतल्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटले.
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून ४२ कोटी लोकांना ६८,८२० कोटी रुपयांचे अर्थसहाय्य मिळाले. ही मदत गरिबांचे हित करण्यासाठी व कोरोनाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी देण्यात आली आहे. केंद्र सरकारने कोरोनाच्या काळात महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी मोफत धान्य आणि रोख रक्कम जाहीर केल्याचेही राष्ट्रपतींनी अभिभाषणात म्हटले आहे.