नवी दिल्ली - सॅमसंगने स्पर्धक असलेल्या चिनी स्मार्टफोन कंपन्यांना व्यवसायात चांगलीच टक्कर दिली आहे. गॅलेक्सी ए श्रेणीचे मोबाईल ७० दिवसांत ५० लाख विकले गेल्याचे सॅमसंग इंडियाने म्हटले आहे. यामुळे कंपनीची १ मार्चपासून १०० कोटी डॉलरची आर्थिक उलाढाल झाल्याचे सॅमसंगने म्हटले आहे.
सॅमसंग इंडियाने गॅलेक्सी ए श्रेणीचे 'गॅलेक्सी ए ५०, ए ३०, ए२०, ए १०, ए ७० व ए २ कोअर ' हे मॉडेल बाजारात आणले आहेत. सॅमसंग इंडियाचे उपाध्यक्ष तथा मुख्य विपणन अधिकारी रणजीवजीत सिंग म्हणाले, चालू वर्षात ए श्रेणीच्या सॅमसंगच्या ब्रँडची उलाढाल ४०० कोटी डॉलर करण्याचे उद्दिष्ट आहे. आम्ही हे उद्दिष्ट गाठण्याच्या मार्गावर आहोत. हे वर्ष आमच्यासाठी विक्रम करणार असेल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.
गॅलेक्सी ए ७० होणार लॉन्च
गॅलेक्सी ए ७० चा शुभारंभ एप्रिलमध्ये करण्यात आला. या मॉडेलची किंमत २८ हजार ९९० रुपये आहे. त्यानंतर कंपनी आता 'ए ८०' चा बाजारपेठेत पुढील महिन्यात शुभारंभ करणार आहे. यामध्ये फिरणारे तीन कॅमेरांची सिस्टिम असणार आहे. या महिन्यापासून ग्राहकांना मोबाईल खरेदीसाठी नोंदणी करता येणार आहे.
भारताच्या स्मार्टफोनच्या बाजारपेठेत चीनची शिओमी पहिल्या क्रमांकावर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर सॅमसंग आहे. मात्र प्रिमिअम मोबाईलच्या विक्रीत सॅमसंग पहिल्या क्रमांकावर आहे. यापूर्वी सॅमसंगला मागे टाकून वन प्लस या चीनच्या स्मार्टफोन कंपनीने प्रिमिअम मोबाईलमध्ये टॉपचे स्थान मिळविले होते.