मुंबई - देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत कार्पोरेट क्षेत्रातील दिग्गज राहतात. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडत आहे. या निवडणुकीत अनिल अंबानी, टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन आणि आदी गोदरेज यांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला.
वरळीमधील सेंट्रल मुंबईमध्ये चंद्रशेखरन यांनी पत्नीसमेवत मतदान केले. गोदरेज यांनी दक्षिण मुंबईमधील मलबार हिलमध्ये मतदान केले. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी लोकशाहीतील मतदानाचा हक्क हा त्यांच्या सरकारी घराजवळ असलेल्या पेडर रोड येथे बजावला. गव्हर्नपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचे पहिले मतदान आहे.
अनिल अंबानी यांनी कफे परेड येथे तर ऑटो क्षेत्रातील मोठी कंपनी असलेल्या महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे व्यवस्थापकीय संचालक पवन गोयंका यांनी जुहूच्या उपनगरात मतदानाचा हक्क बजावला.
महिंद्रा ग्रुपचे आनंद महिंद्रा यांनी मलबार हिलमध्ये मतदान केले. ते म्हणाले, आम्हाला प्रगतीच्या विषाणुची लागण झाली आहे. जरी एकमेकांचा पाठिंबा घेऊन संयुक्त सरकार जरी आले तरी देश प्रगतीच्या दिशेने जाणे आवश्यक आहे. आशियातील सर्वात जुना शेअर बाजार असलेल्या बीएसईचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष चौहान यांनीही मतदान केले. अमेरिकन ब्रोकेज मॉर्गॅन स्टॅनलेचे व्यवस्थापक संचालक रिद्धम देसाई यांनीही मतदानाचा हक्क बजावला.
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात राहतात सर्वाधिक दिग्गज-
मुंबईतील दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात कार्पोरेट क्षेत्रातील सर्वाधिक दिग्गज राहतात. या मतदारसंघात शिवसेनेचे अरविंद सावंत आणि काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्यात चुरशीची लढत आहे. नुकताच रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आणि बँकर उदय कोटक, मिलिंद देवरा यांनी मिलिंद देवरा यांना जाहीर पाठिंबा दिला होता. महाराष्ट्रातील १७ लोकसभेच्या जागांसाठी सकाळी सात वाजल्यापासून मतदान सुरू आहे. या मतदारसंघात एकूण ३.११ कोटी मतदार आहेत.