नवी दिल्ली - जे लोक इंटरनेटचा आक्षेपार्हपणे वापर करतात, ते गोपनीयतेच्या अधिकाराची विनंती करू शकत नाहीत, असे मत माहिती तंत्रज्ञान आणि कायदेमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी व्यक्त केले. प्रसाद यांनी समाज माध्यमातून पसरण्यात येणाऱ्या खोट्या बातम्या आणि अफवांवर चिंता व्यक्त केली. ते ऑबझर्व्हर रिसर्च फाउंडेशनने आयोजित केलेल्या सायबर सुरक्षेच्या परिषदेत बोलत होते.
रवीशंकर प्रसाद म्हणाले, जे लोक समाजात गोंधळ निर्माण करणारे संदेश व्हॉट्सअॅपमधून पसरवितात त्या संदेशांचे उगमस्त्रोत समजले पाहिजेत. असे लोक खोट्या बातम्या आणि अफवा पसरवितात. दहशतावाद्याला गोपनीयतेचा अधिकार आहे का? जे लोक हिंसाचाराला उत्तेजन देतात त्यांना गोपनीयतेचा अधिकार आहे का? या प्रश्नांना आम्ही सामोरे जात आहोत. महत्त्वाचे म्हणजे दहशतावाद्यांसाठी सोशल माध्यम हे चांगले माध्यम आहे. सर्वोच्च न्यायालयाचा दाखला देत त्यांनी दहशतवादी हे गोपनीयतेची विनंती करू शकत नसल्याचे म्हटले.
समाज माध्यमाच्या गैरवापराबद्दल बोलताना ते म्हणाले, व्हॉट्सअॅप हे चांगले साधन आहे. खोडसाळपणा करणारे लोक व्हॉट्सअॅपचा आक्षेपार्ह वापर करतात. ते अफवा पसरवितात. त्यातून हत्या घडतात. काय केले पाहिजे? त्यासाठी रॉकेट विज्ञानाची आवश्यकता नाही. एकाच दिवशी एकाच ठिकाणी एकाच विषयावर अफवा पसरविल्या जातात. त्याचे उगमस्थान समजलेच पाहिजे, असे प्रसाद म्हणाले.
हेही वाचा-चित्रपटांचा गल्ला कोट्यवधींचा, मग अर्थव्यवस्थेत मंदी कशी; कायदेमंत्र्यांचा अजब तर्क
व्हॉट्सअॅपच्या संदेशाचे उगमस्थान कळण्यासाठी यंत्रणा विकसित करण्याबाबत माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने व्हॉट्सअॅप कंपनीला विचारणा केली आहे. या अॅपचा दहशतवादी आणि अतिरिकी लोकांकडून वापर केला जात असल्याचे दिसून आल्याचे प्रसाद यांनी म्हटले.
हेही वाचा-ईडीचा दणका; एचडीआयएलसह पीएमसीच्या अधिकाऱ्यांची ३,८३० कोटींची मालमत्ता जप्त
व्हॉट्सअॅपमध्ये इनक्रिप्शन या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. व्हायरल संदेश पसरविण्यावर नियंत्रण आणण्यासाठी व्हॉट्सअॅपने संदेश पाठविण्यासाठी मर्यादा घालून दिली आहे. व्हॉट्सअॅप संदेशाचे उगमस्थान शोधून देणाऱ्या यंत्रणेबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही.