नवी दिल्ली – मेक इन इंडियाला प्रोत्साहन देण्याकरता स्मार्टफोनचा ब्रँड असलेल्या रिअलमीने नोएडात टीव्हीचे उत्पादन सुरू केले आहे. त्यासाठी कंपनीने 300 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
परवडणाऱ्या दरातील स्मार्ट टीव्हीचे उत्पादन करण्यासाठी रिअलमीने सरफेस माउंट टेक्नॉलॉजीचा (एसएमटी) वापर मे महिन्यात सुरू केला आहे. नव्या एसएमटी लाईनसाठी कंपनीने 300 कोटींची गुंतवणूक केली आहे. टाळेबंदीनंतर मागणी वाढत असताना गरजेची पूर्तता करण्यासाठी कंपनीने ही गुंतवणूक केली आहे. टीव्हीचे सुट्टे भाग ते पूर्ण असेम्बलिंग करण्याची सुविधा नोएडामधील उत्पादन केंद्रात आहे.
रिअलमी इंडियाचे सीईओ आणि उपाध्यक्ष माधव सेठ म्हणाले, की स्मार्टफोनचे देशात संपूर्णपणे उत्पादन करण्याची आम्ही वचनबद्धता दाखविली. त्याचपद्धतीने आम्ही स्मार्ट टीव्हीचे देशात 100 टक्के उत्पादन करणार आहोत. त्यामधून आम्ही टाळेबंदीनंतर आर्थिक विकासदात योगदान देणार आहोत. जागतिक दर्जाची उत्पादने देशात तयार होवू शकतात, यावर रिअलमीचा विश्वास आहे.
रिअलमी स्मार्ट हा 32 इंचचा 12,999 रुपयांना तर 32 इंचचा 21,999 रुपयांना उपलब्ध आहे. कंपनी लवकरच 55 इंचचा टीव्ही बाजारात उपलब्ध करणार आहे. रिअलमी स्मार्ट टीव्ही हा अँड्राईड 9.0 वर काम करतो. त्यामध्ये गुगल असिस्टंटने टीव्ही नियंत्रित करता येतो. मीडिया टेक 64 बिट क्वाड कोअर प्रोसेसरचा वापर करण्यात आलेला रिअलमीचा सर्वात कमी किमतीचा बाजारात उपलब्ध झालेला टीव्ही आहे.