लंडन - कर्ज बुडवून पळून गेलेल्या नीरव मोदीचा जामीन अर्ज इंग्लंडच्या न्यायालयाने आज तिसऱ्यांदा फेटाळला आहे. त्याच्या प्रत्यार्पणाची सध्या प्रक्रिया सुरू आहे. मोदीवर मनी लाँड्रिग आणि पंजाब नॅशनल बँकेच्या फसवणूक प्रकरणी भारतात गुन्हे दाखल झाले आहेत.
४८ वर्षीय मोदी हा लंडनच्या दक्षिण-पश्चिमेत असलेल्या वँडसवर्थ तुरुंगात कैद आहे. वेस्टमिनिस्टर न्यायालयाचे मुख्य न्यायदंडाधिकारी इम्मा अर्बथनॉट यांच्यासमोर व्हिडिओ सुनावणी झाली. फार कमी वेळ चाललेल्या सुनावणीनंतर मोदीला २४ मेपर्यंत कोठडी सुनावण्यात आली. त्यांनी नीरव मोदीची ३० मे रोजी सुनावणी ठेवली आहे. यापूर्वी मुख्य न्यायदंडाधिकारी अर्बथनॉट यांनी २९ मार्चला मोदीचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता.
मोदी हा गुंतवणूकदाराच्या व्हिसाने इंग्लंडमध्ये राहत असल्याचा अंमलबजावणी संचालनालयाचा अंदाज आहे. हा गोल्डन व्हिसा अत्यंत श्रीमंत असलेल्या व्यक्तींना इंग्लंडमध्ये रहिवास करण्याचे हक्क मिळून देतो. त्यासाठी गुंतवणूकदाने किमान २० लाख डॉलर्सची गुंतवणूक करणे बंधनकारक असते. नीरव मोदीला स्कॉटलंड यार्डच्या अधिकाऱ्यांनी १९ मार्चला अटक केली आहे.