मुंबई - स्थावर मालमत्ता क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी समाजातील सर्व वर्ग पसंती देतात. या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळत आहे. यामुळे घर विकत घेणे आणि भाड्याने देणे, याकडे अनिवासी भारतीयांचा कल वाढला आहे.
अनिवासी भारतीयांची सर्वात अधिक ग्राहक क्रयशक्ती असते. यामुळे अनिवासी भारतीय हे आलिशान घरांबरोबर परवडणाऱ्या दरातील घरेही विकत घेतात.
असा मिळतो घरांवरील गुंतवणुकीतून परतावा-
अॅनारॉक प्रॉपर्टी कन्सलटंटच्या सर्वेनुसार परवडणाऱ्या दरातील घरांपासून ८ ते १० टक्के परतावा मिळतो. तर मध्यम दर्जाचा घरांपासून अनिवासी भारतीयांना ६ ते ८ टक्के परतावा मिळतो. तर आलिशान घरांपासून ३ ते ५ टक्के परतावा मिळत असल्याचे अहवालात म्हटले आहे.
२०१५ च्या मंदीपूर्वी अनिवासी भारतीयांना रहिवासी स्थावर मालमत्तेपासून चांगला परतावा मिळत होता. मात्र नोटबंदी, रेरा आणि जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर अनिवासी भारतीयांनी व्यावसायिक प्रकल्पांवर लक्ष केंद्रित केले. २०१८ च्या सुरुवातीला रहिवासी मालमत्तेवर चांगला परतावा मिळण्यास सुरुवात झाली. सध्या भाड्यापासून उत्पन्न मिळविण्यासाठी अनिवासी हे परवडणाऱ्या घरांवर लक्ष केंद्रीत करत आहेत.
अनिवासी भारतीयांची अशी वाढली गुंतवणूक-
अनिवासी भारतीयांनी देशातील बाजारपेठेत २०१४ मध्ये ५०० कोटी डॉलरची गुंतवणूक केली. तर २०१८ मध्ये १००० कोटी २ लाख डॉलरची गुंतवणूक केली आहे. तर २०२० मध्ये अनिवासी भारतीय हे १८ हजार कोटी डॉलरची गुंतवणूक करतील, असा अंदाज अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.