नवी दिल्ली - देशातील वाहन निर्मिती क्षेत्रातील आघाडीची कंपनी मारुती सुझुकी इंडियाने एप्रिल २०२० पासून डिझेलवर चालणाऱ्या कारची निर्मिती आणि विक्री बंदी करणार असल्याचे सांगितले आहे. एप्रिल २०२० पासून प्रदूषणविषयक ‘बीएस-६’ नियम लागू होत असल्याने कंपनीने हा निर्णय घेतला आहे. नव्या प्रदूषण विषयक नियमांमुळे डिझेल वाहने निर्मितीतील खर्च वाढण्याचा अंदाज आहे.
सध्या मारुती कंपनीकडून डिझेलवर चालणाऱ्या अनेक वाहनांची विक्री आणि उत्पादन केले जात आहे. भारतात या एकट्या कंपनीकडून जवळपास २३ टक्के डिझेल वाहनांची विक्री होते. एप्रिल २०२० पासून प्रदूषणविषयक ‘बीएस-६’ नियमावली लागू होत असल्याने कंपनीने हा निर्णय घेतला आहे. नवीन प्रदूषणविषयक नियमांचे पालन करताना डिझेल वाहनांचा उत्पादन खर्च वाढेल. त्यामुळे ग्राहकांना डिझेल गाड्या वापरणे व्यवहार्य ठरणार नाही, असे मारुती सुझुकी इंडियाचे अध्यक्ष आर. सी. भार्गव यांनी सांगितले.
प्रवासी वाहनविक्रीत आघाडीवर असलेल्या मारुती सुझुकीची एस-क्रॉस, सियाझ, ब्रेझा, स्विफ्ट डिझायर, स्विफ्ट आणि बलेनो ही वाहने डिझेल इंधन प्रकारातही आहेत. मारुती सुझुकीचा देशांतर्गत प्रवासी वाहन बाजारपेठेत ५० टक्क्यांहून अधिक हिस्सा आहे. भविष्यात डिझेल कारचे उत्पादन बंद केल्याने कंपनी सीएनजी आणि हायब्रिड या तंत्रज्ञानावर आधारित वाहने विकसित करेल, असे भार्गव यांनी सांगितले.
विदेशी विनिमय चलनातील तफावत आणि कमी झालेल्या वस्तूंच्या दरामुळे मारुती सुझुकीचे जानेवारी- मार्च तिमाहीतील उत्पन्न घसरले आहे. सुझुकीच्या निव्वळ नफ्यामध्ये ०.७ टक्क्यांनी घसरण झाली असून ते ४.६ टक्यांवर येऊन थांबले आहे. चौथ्या तिमाहित उत्पन्नात १ हजार ७९६ कोंटींची नोंद झाली आहे. वाहन विक्रीचा वाढता खर्च आणि उत्पादनाचा वाढता घसारा यामुळे कंपनीच्या खर्चात वाढ झाल्याचे कंपनीने सांगितले.