नवी दिल्ली - विमान प्रवासाचा अनुभव घ्यायचाय.. अर्थात त्यासाठी विमानामधून प्रवास करावा लागतो. पण तशा दर्जाची सेवा रेल्वेमधून मिळाली तर ? ही कल्पना सत्यात आणण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून वंदे भारत एक्सप्रेसमध्ये पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे.
आयआरसीटीसीने ३४ हवाई सुंदरींना आणि विमान कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांचे प्रशिक्षण दिले आहे. हा प्रकल्प यशस्वी झाला तर इतर रेल्वेतही राबविण्यात येणार आहे. रेल्वेच्या पथदर्शी प्रकल्पाची जबाबदारी इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनवर (आयआरसीटीसी) देण्यात आली आहे.
आयआरसीटीसीचे प्रवक्ते सिद्धार्थ सिंह म्हणाले, विमान सुंदरी आणि विमान कर्मचाऱ्यांना मासिक २५ हजार रुपये पगार दिला जात आहे. रेल्वेने प्रवाशांना अधिकाधिक चांगली सेवा देण्यासाठी मोठे पाऊल टाकले आहे.
फेब्रुवारीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली आणि वाराणसीदरम्यान वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेला हिरवा कंदील दाखविला होता. या रेल्वेची संरचना आणि निर्मिती चेन्नईच्या उत्पादन प्रकल्पात करण्यात आली आहे. पूर्णपणे देशात तयार झालेल्या रेल्वेत ३० टक्के इलेक्ट्रिक उर्जेची बचत करणे शक्य होते.