मुंबई - मुंबईत कोरोना विषाणूच्या रुग्णांचे रोज मृत्यू होत आहेत. कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून रुग्णांचे मृतदेह प्लस्टिकच्या पॅक बंद बॅगमध्ये ठेवला जातो. मात्र पालिकेकडून खरेदी करण्यात येणाऱ्या 'स्पेशलाइज' बॉडी बॅगबाबत भाजपकडून तसेच, सोशल मीडियावर आरोप झाल्यावर पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी निविदा प्रक्रिया रद्द केली आहे. तर या आधी पालिकेने केंद्र सरकारच्या निकषांनुसारच महापालिका रुग्णालयांसाठी २ हजार २०० बॉडी बॅग्जची खरेदी करण्यात आल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा ५५ हजार ३५७ वर तर मृतांचा आकडा २ हजार ४२ वर पोहोचला आहे. 'कोविड-१९' ने बाधित झालेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास केंद्र शासनाच्या निर्देशांनुसार सदर मृतदेह 'बॉडी बॅग' मध्ये ठेऊन अंत्यसंस्कारासाठी दिला जातो. त्यासाठी पालिकेने संकेतस्थळावरुन निविदा प्रक्रिया राबवली होती. केंद्र सरकारच्या निकषांनुसारच बॉडी बॅग खरेदी करण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या स्तरावर उत्पादनाची तांत्रिक छाननी करण्यासाठी सूक्ष्मजीवशास्त्रज्ञांच्या नेमण्यात आलेल्या 'पॅनल' द्वारेही याबाबत तंत्रशुद्ध छाननी करण्यात आली होती. निवड करण्यात आलेल्या बॉडी बॅगची केंद्र शासनाच्या संकतेस्थळावर ७ हजार ८०० रुपये इतकी किंमत आहे. ही एक बॅग महापालिकेला ६ हजार ७०० रुपयांना उपलब्ध झाली असल्याचे आयुक्तांनी म्हटले आहे.
मुंबईत मृतांची संख्या वाढत असल्याने भविष्याचा विचार करत कोरोना मृतदेहांसाठी बिन टाक्याच्या बॉडी बॅग्स विकत घेण्यासाठी पालिकेने २३ मे रोजी निविदा काढल्या. निविदेला तांत्रिक दृष्ट्या निविदकारांचा प्रतिसाद न मिळाल्याने सदर निविदा प्रक्रिया रद्द करून नव्याने निविदा काढण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. तसेच या अनुषंगाने पुन्हा निविदा काढण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
बिन टाका बॉडी बॅग -
केंद्र शासनाच्या निर्धारित निकषांनुसार महापालिकेच्या रुग्णालयांसाठी खरेदी करण्यात आलेल्या बॉडी बॅग या 'स्पेशलाइज' पद्धतीच्या असून त्या नेहमीच्या सामान्य बॉडी बॅगच्या तुलनेत अधिक सुरक्षित व बिनटाका पद्धतीने तयार केलेल्या आहेत. जेणेकरुन विषाणूच्या संभाव्य प्रादुर्भावापासून अधिकाधिक सुरक्षितता मिळू शकते.