मुंबई - आज सकाळपासून मुंबईच्या टोल नाक्यांवर पोलिसांकडून करण्यात आलेल्या वाहनांच्या कारवाईवर मनसेने टीका केली आहे. सरकारला लॉकडाऊन करायचे की अनलॉक हे आधी स्पष्ट करावे, असे मनसेचे सरचिटणीस नितीन सरदेसाई यांनी म्हटले आहे.
गेल्या 3 महिने घरी बसल्यावर अनलॉक 1 मध्ये अनेक नागरिक आपल्या वाहनांनी प्रवास करत आहेत. त्यात आज पोलिसांनी कारवाई करत घराबाहेर पडलेल्या वाहनचालकांच्या गाड्याही जप्त केल्या आहेत. त्यावर नितीन सरदेसाई यांनी संतप्त सवाल करत सरकारला नक्की काय अभिप्रेत आहे, असा सवाल केला आहे.
एकीकडे गेले 3 महिने अनेकांना पगार नाही. त्यात रेल्वे बंद असल्याने अनेकजण आपल्या वाहनांनी कार्यालय गाठतात. त्यावर आजची कारवाई अयोग्य असल्याचे सरदेसाई यांनी म्हटले आहे. जर, सरकारला आदेश द्यायचा असेल तर त्याची 3 ते 4 दिवस प्रसिद्धी करावी आणि त्यानंतर त्याची अंमलबजावणी करावी, असे सरदेसाई यांनी सांगितले.