मुंबई - इंग्लंडमध्ये ३० मेपासून सुरू होणाऱ्या विश्वकरंडकाची क्रिकेट प्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत. आतापर्यंत झालेल्या विश्वकरंडकात सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज ग्लेन मॅक्ग्राथ याच्या नावावर आहे. तो विश्वकरंडकातील सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. त्याने आतापर्यंत ३९ सामन्यांत ७० बळी घेतले आहेत. मॅक्ग्राथची १५ धावांत ७ बळी घेण्याची सर्वात चांगली वैयक्तिक कामगिरी आहे.
मॅक्ग्राथनंतर श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनने ४० सामन्यांत ६८ बळी घेतले. वसीम अक्रमने ३८ सामन्यांत ५५ बळी घेत तिसरे स्थान पटकाविले. चामिंडा वासच्या नावावर ३१ सामन्यांत ४९ बळीची नोंद आहे. भारताचा जहीर खान या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने २३ सामन्यांत ४४ गडी बाद केले आहेत, तर जवागल श्रीनाथ ३४ सामन्यात ४४ गडी बाद करून सहाव्या क्रमांकावर आहे.
वरील गोलंदाजांचे विक्रम मोडण्यासाठी सध्या एकही गोलंदाज शर्यतीत नाही. यंदाच्या विश्वचषकात १० संघ सहभागी होत आहेत. यंदा पहिला सामना इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रंगणार आहे. मागील विश्वचषक ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. त्यांच्यावर यंदा किताब राखण्याचे दडपण असेल.