रांची : सध्याच्या भारत, पाकिस्तान आणि बांग्लादेशात पसरलेली ब्रिटिश वसाहतकारांची स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील राजवट अतिशय जुलमी होती. या राजवटीविरोधात अनेक ठिकाणी बंड आणि उठावही झाले. मात्र हे उठाव दडपण्यात ब्रिटिश यशस्वी ठरले. याला अपवाद ठरले ते झारखंडमधील आदिवासींचे बंड. बंदूक आणि तोफा अशा अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असलेले ब्रिटिश सैनिक आदिवासी क्रांतीकारकांना मात्र चांगलेच घाबरायचे. याचे कारण म्हणजे ते पारंपरिक शस्त्रे वापरण्यात अतिशय पारंगत होते. गनिमी काव्याने हल्ला चढविण्यात पारंगत असलेल्या आदिवासींसमोर ब्रिटिशांना अनेकदा शरणागती पत्करावी लागली होती. त्यामुळेच या आदिवासींचे बंड हे इतर बंडांपेक्षा वेगळे ठरले. झारखंडमधील भौगोलिक स्थितीही आदिवासींना अनुकूल असल्याने त्यांच्यावर विजय मिळविणे ब्रिटिशांना अवघड बनले होते.
पारंपरिक शस्त्रास्त्रे वापरण्यात आदिवासी निपूण
पारंपरिक शस्त्रास्त्रांवर आदिवासींची चांगलीच श्रद्धाही असते. ही शस्त्रे आपल्याला सकारात्मक शक्ती देतात असे आदिवासी मानतात. आदिवासी समुदायाकडून पुरातन काळापासूनच धनुष्यबाण, भाले, काठ्या अशा शस्त्रांचा वापर केला जातो. स्वसंरक्षणासाठी आदिवासी या शस्त्रांचा वापर करतात. ही शस्त्रे वापरण्यात ते अतिशय निपूणही असतात. शस्त्रे अधिक घातक व्हावी यासाठी आदिवासी बाणांच्या टोकावर विशेष प्रकारचे मिश्रण लावतात. विशिष्ट जंगली वनस्पतींचे हे मिश्रण शस्त्रूसाठी घातक ठरते. काही मिश्रण हे शत्रूला दीर्घ कालावधीसाठी घातक ठरते. ज्यामुळे शत्रूचा लवकर मृत्यू न होता त्याला दीर्घ कालावधीसाठी वेदना होतात.
गनिमी काव्याचा वापर
आदिवासींकडून वेगवेगळ्या युद्धकला आणि रणनीतींचा वापर केला जायचा. आधी जंगलात लपून बसत शत्रूची वाट बघायची. शत्रूची चाहूल लागताच चारही बाजूंनी शत्रूवर हल्ला करायचा. अशा हल्ल्यात आदिवासीही जखमी व्हायचे. मात्र जंगलातील वनौषधींची चांगली जाण असल्याने जखमांवर उपचार करण्यासाठी याचा त्यांना उपयोग होत असे. आदिवासी ज्या जंगलांमध्ये राहतात तिथे सहजपणे उपलब्ध होणाऱ्या बांबूपासून आदिवासी त्यांची शस्त्रे बनवितात. लोखंडाचाही वापर ते यात करतात. आणि हेच त्यांच्या पारंपरिक शस्त्रास्त्रातील निपुणतेचे रहस्य आहे.
आदिवासींसाठी स्वातंत्र्यलढा हा श्रद्धेचाही लढा
जबरा पहाडीया ते सिदो-कान्हो आणि निलांबर-पितांबर ते बिरसा मुंडा अशा अनेक आदिवासी क्रांतीकारकांनी स्वातंत्र्य लढ्यात देशासाठी बलिदान दिले. हे सर्व पारंपरिक शस्त्रे वापरण्यात पारंगत होते. आदिवासींसाठी हा केवळ स्वातंत्र्य लढा नव्हता तर हा श्रद्धेचा लढाही होता. कारण आदिवासी हे पाणी, जंगल आणि जमीनीलाच देव मानतात.
हेही वाचा - स्वातंत्र्याची 75 वर्षे : राणी अवंतीबाईंचा ब्रिटिश साम्राज्याविरोधातील विस्मरणात गेलेला लढा, जाणून घ्या..