नवी दिल्ली - महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यादरम्यान, झालेला मिठाचा सत्याग्रह हा, भारतातील तत्कालीन ब्रिटिश शासनाने मिठासारख्या जीवनावश्यक गोष्टीवर लावलेल्या कराच्या विरोधात 1930 साली घडलेला सत्याग्रह होता. यालाच दांडी सत्याग्रह किंवा दांडीयात्रा असेही म्हणतात. इंग्रजांची जुलमी राजवट उलथवून टाकण्यासाठी देशभर ज्या चळवळी केल्या गेल्या, त्यात गांधीजींची दांडी यात्रा म्हणजेच मिठाचा सत्याग्रह कळसाध्याय आहे.
14 फेब्रुवारी 1930 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने जनतेला गांधीजींच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंग करण्याचा आदेश दिला होता. 2 मार्च 1930 रोजी गांधीजींनी व्हायसराय इर्विन (गव्हर्नर जनरल) यांच्याकडे प्रस्ताव ठेवला होता. त्याअंतर्गत भूसंपादनाच्या अंदाजामध्ये सवलत, सैन्य खर्चात कपात, परदेशी कपड्यावर कर वाढविणे आणि मीठावरील कर रद्द करणे यासह 11 वेगवेगळ्या मागण्यांचा प्रस्ताव स्वीकृतीसाठी पाठवला. तथापि, गांधीजींनी पाठविलेला प्रस्ताव व्हायसरायने गांभीर्याने न घेता फेटाळला. तर 5 मार्च 1930 ला महात्मा गांधी यांनी मिठाच्या सत्याग्रहाची जाहिरीत्या प्रथम घोषणा केली.
- मिठाच्या सत्याग्रहाची सुरुवात दांडी यात्रेने झाली. ही दांडी यात्रा (मोर्चा) साबरमती आश्रमापासून 12 मार्च 1930 रोजी सुरू झाली.
- गांधीजींच्या बरोबर त्यांचे अनुयायी होते.
- ही यात्रा जवळपास 24 दिवस चालली आणि तिच्यातील लोक 241 कि.मी. पर्यंत पायी चालले.
- 6 एप्रिल 1930 ला दांडी येथे समुद्रकिनारी ही यात्रा पोहचली. त्या दिवशी जेव्हा सकाळी साडे सहा वाजता गांधीजींनी चिमूटभर मीठ उचलून कायदेभंग केला. या घटनेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले होते. यानंतर अन्यायकारक आंदोलने मोडीत काढण्यासाठी परकीय सरकारच्या कायद्यांना आव्हान देण्याची हिंमत लोकांमध्ये संचारली.
दांडीच्या दक्षिणेला 25 मैलांवर असलेल्या धारासणा या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह करण्याचे काँग्रेस पक्षाने ठरवले. पण त्यापूर्वीच 4-5 मे 1930 दरम्यानच्या रात्री गांधीजींना अटक करण्यात आली. दांडी यात्रा आणि धारासणा येथील सत्याग्रह यामुळे सर्व जगाचे लक्ष भारतीय स्वातंत्र्यलढ्याकडे वेधले गेले. मिठाचा सत्याग्रह म्हणजे असहकार चळवळीचा एक भाग होता. प्रत्यक्षात मिठावरचा कर हे केवळ निमित्त होते. मिठावरील कराच्या विरोधातील हे आंदोलन पुढे वर्षभर सुरू राहिले. गांधीजींची तुरुंगातून सुटका आणि लॉर्ड आयर्विन यांच्याशी दुसऱ्या गोलमेज परिषदेतील चर्चा झाल्यावर हे आंदोलन थांबले. मिठाच्या सत्याग्रहाच्या आंदोलनाच्या दरम्यान 60 हजारहून अधिक भारतीय तुरुंगात गेले.
मिठाच्या सत्याग्रहाने स्वातंत्र्य लढ्याला मोठे बळ मिळाले. जग बदलणाऱ्या 10 महत्त्वपूर्ण आंदोलनात या सत्याग्रहाचा समावेश टाईम नियतकालिकाने केला आहे. गांधींच्या नेतृत्वाखाली सुरु झालेला हा सत्याग्रह एक राष्ट्रीय स्वातंत्र्याचा, अन्याय आणि आत्याचाराविरोधात ठामपणे उभे राहण्याचा विचार होता.