कोलकाता - पश्चिम बंगाल आणि केंद्र सरकार यांच्यातील वाद थांबण्याचे नाव घेत नाही. या वादात आणखी एक ठिणगी पडण्याची शक्यता आहे. केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे प्रवक्ते नेते आणि बीकेयुचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. निवडणूक जिंकल्याबद्दल ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन केलं. दीदींनी एका मोठ्या शत्रूला हरवलं आहे, असेही राकेश टिकैत म्हणाले. तसेच शेतकरी आंदोलनाला समर्थन जारी राहणार असल्याचे आश्वासन ममतांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.
टीएमसीने भाजपाचा पराभव करून मोठा विजय मिळवला आहे. ममतांनी आता विरोधीपक्षांना मजबूत करण्यासाठी एक मॉडेल तयार करावे, असे राकेश टिकैत म्हणाले. राकेश टिकैत यांनी यापूर्वी पश्चिम बंगाल राज्याचा दौरा केला होता. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी राज्यात शेतकरी सभा घेतल्या होत्या. तसेच भाजपाविरोधात ममतांचे समर्थन केले होते.
कृषी कायद्याविरोधात ममतांची भूमिका -
केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात ममता बॅनर्जी यांनी भूमिका घेतलेली आहे. तसेच उघडपणे त्यांनी शेतकरी आंदोलनाला समर्थन दिले आहे. तसेच टीएमसीच्या नेत्यांनी शेतकरी आंदोलन सुरू असलेल्या दिल्ली बॉर्डरला भेट दिली होती आणि समर्थन दर्शवले होते. पश्चिम बंगालमध्येही कृषी कायद्याविरोधात विधेयक पारित करण्यात आले आहे. पश्चिम बंगालचे संसदीय कार्यमंत्री पार्थ चटर्जी यांनी विधानसभेत केंद्राचे तीन कृषी कायदे मागे घेण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता.